Join us

२०५० पर्यंत शेतीचे भवितव्य कसे असेल? मराठवाड्याच्या प्रगतीची दिशा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 6:00 PM

स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा महाराष्ट्रात सगळ्या विभागापेक्षा मागासलेला समजला जायचा. तो आता हळूहळू प्रगतीची उच्चांकी झेप जरी घेत नसला तरी समाधानकारक ...

स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा महाराष्ट्रात सगळ्या विभागापेक्षा मागासलेला समजला जायचा. तो आता हळूहळू प्रगतीची उच्चांकी झेप जरी घेत नसला तरी समाधानकारक वाटचाल करीत आहे. मराठवाड्यातील ७४ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे.

विभागात एकूण ६४ लक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ४८ लक्ष हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. विभागात लहान-मोठी एकूण ११७३ धरणे अथवा प्रकल्प आहेत. प्रदेशातील १८ टक्के क्षेत्र बागायती तर उर्वरित जिरायती आहे. विकासाच्या बाबतीत पुढील २५ वर्षांचा विचार करायचा झाल्यास लागवडीखालील क्षेत्रामध्ये रस्ते कारखाने आणि वसाहतीसाठी अकृषक झाल्यामुळे साधारणतः सहा ते सात लाख हेक्टरने घट होईल. मात्र, कोकणातून १५० टीएमसी तर इतर मार्गाने ५० ते ६० टीएमसी पाणी मराठवाड्यात बाहेरून आणणे शक्य आहे. ठिबक, तुषार सिंचन आदी आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास सिंचित क्षेत्र ३६ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

पीकनिहाय विचारअतिघन लागवड, बीटीच्या पुढील आवृत्ती, ठिबकचा वापर, आधुनिक फर्टिगेशन आणि बियाणे कंपन्यांच्या प्रयत्नाने कापसाची उत्पादकता प्रतिहेक्टरी ४५ ते ५० क्विंटलपर्यंत वाढणार आहे. जालना जिल्ह्यात गट शेतीमध्ये आताच हेक्टरी ५० क्विंटलपर्यंतचे उत्पादन १९ गावांतील शेतकरी घेत आहेत. सोयाबीनचे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे आले नाही. मात्र, आता सध्याचे १२ ते १५ क्विंटल प्रतिहेक्टरीचे उत्पादन वाढत आहे. जेनेटिकली मॉडिफाइड बियाणे येऊन ठिबक, फर्टिगेशन, पीक संरक्षण यात क्रांती होऊन आपले उत्पादकता प्रतिहेक्टर ६५ ते ७० क्विंटलपर्यंत जाईल. पुढील २५ वर्षांत येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हेक्टरी दीडशे क्विंटल उत्पादन मक्याचे होईल.

ठिबकचा वापर पाण्याचा ताण सहन करणारे वाण, फर्टिगेशन अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन उसाची उत्पादकता हेक्टरी १७० ते १८० टनापर्यंत जाईल. इथेनॉलमुळे उसाचे भाव वाढतील. मराठवाडा हा मोसंबीचे आगार म्हणून ओळखला जातो. न्यू सेलर, काटोल गोल्ड, फुले मोसंबी आदी नवीन वाणांसोबतच मोसंबीचे उत्पादकता वाढणार आहे. पैठण येथे ४६ करोड रुपयांची सिट्रस क्लस्टर विकसित होत आहे. मराठवाड्यातील केसर आंबा हा युरोप, अमेरिका, जपानमधील खवय्यांना आकर्षित करीत आहे. महा केसर आंबा बागायतदार संघाच्या माध्यमातून अतिघन लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

आगामी काळात.- येत्या २५ वर्षांमध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा शेतीमालावर प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु होईल.   - नवीन तंत्रज्ञानाचा विचार करण्याचा झाल्यास जनूक संपादित वाण ज्यामध्ये विविध रोगांनी प्रतिकार, दुष्काळ सहनशीलता किंवा अधिक चांगले तेल यासारखी वैशिष्ट्ये असतील.- येथे फवारणीसाठी आधुनिक अशी ड्रोन तर शेती कामासाठी यंत्रमानवाचा वापर सुद्धा या काळात नक्कीच होईल.- मराठवाड्यातील शेतीचे भवितव्य २०५० पर्यंत उत्साहवर्धक असेल.

डॉ. भगवानराव मा. कापसेलेखक गट शेती प्रणेते तथा फळबाग तज्ज्ञ आहेत

टॅग्स :शेतीशेतकरीपीकपीक व्यवस्थापन