Join us

नव्या पिढीला सांगणार काय? बेसूमार जंगलतोड, वणव्यांमुळे रानमेवा झालाय दिसेनासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 3:13 PM

नांदेड जिल्ह्यातील जंगलात मिळणारा रानमेवा काही वर्षांपासून कमी प्रमाणात मिळत आहे. जंगलात लागणारे वणवे, वनपट्टे नावाखाली होणारी जंगलतोड, यामुळे रानमेवा ...

नांदेड जिल्ह्यातील जंगलात मिळणारा रानमेवा काही वर्षांपासून कमी प्रमाणात मिळत आहे. जंगलात लागणारे वणवे, वनपट्टे नावाखाली होणारी जंगलतोड, यामुळे रानमेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी कधी काळी बाजारपेठेत विक्रीस असणारा रानमेवा दिसेनासा झाला आहे.

शहरात उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जंगलातून मोठ्या प्रमाणात रानमेवा विक्रीस आणला जात होता. ग्राहकही मोठ्या आवडीने त्याची खरेदी करत असल्याचे दिसून येत होते. परंतु तो रानमेवा आता कमी प्रमाणात मिळत आहे. याचे कारण बदलत्या वातावरणासोबत जंगलात लावले जाणारे मनुष्यनिर्मित वणवे व भविष्याचा कुठल्याही प्रकारे विचार न करता बेसुमार होणारी जंगलतोड हेच आहे.

यंदा जंगलाची काळी मैना म्हणजेच करवंदे खूप कमी प्रमाणात दिसून येत आहेत. तसेच जंगली आवळे, पळसाची पाने, कवठेही दिसेनाशी झाली आहेत. पूर्वी उन्हाळ्यात ग्रामीण भागात घरोघर रानमेवा विक्री करण्यासाठी महिला, पुरुष जात असल्याचे दिसून येत होते. तर शहरात चौकाचौकात दुकाने लागत होते. पण आता हे चित्र दिसून येत नाही. नव्या पिढीला तर रानमेवा काय असतो हे सांगण्याची वेळ आली आहे.

वसंत ऋतू म्हणजे नवचैतन्याचा बहर. पळस, पांगरा, सावर अशा कितीतरी फुलझाडांचा बहर, आसमंतात दरवळणारा आंब्याचा मोहर. ग्रीष्मात या फुलांचे फळांमध्ये रुपांतर होते आणि भारतातील बहुतांश जंगलात रानफळं दिसू लागतात. आवळा, आंबुळकी बोरं, करवंद, धामोड्या अशा कितीतरी डोंगरी रानफळांची चव आवर्जून चाखली जाते. जंगलांची बेसूमार कत्तल, बदलत्या हवामानाने जंगलाला वणवा लागल्याचे प्रमाण वाढत असून हा जंगली रानमेवा बाजारातून नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :फळेआगशेती क्षेत्र