Join us

चाराप्रश्नी प्रशासनाचे नियाेजन काय? या जिल्ह्यातून इतरत्र चारा विक्रीस बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 9:08 AM

चारा-पाण्याचा प्रश्न निवडणुकीमुळे नेत्यांच्या प्रचारातून गायब, प्रशासनाची पावले काय?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या पाणीटंचाई भेडसावत आहे. ५००च्या आसपास टँकरचा आकडा जाण्याची शक्यता आहे. आता चाराटंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चारा जिल्ह्याबाहेर विक्रीस, वाहतुकीस बंदी घातल्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात पुढील काही महिनेच चारा पुरेल, असे वृत्त 'लोकमत'ने १० एप्रिलच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आढावा घेतला.

जिल्ह्यातील चारा-पाण्याचा प्रश्न निवडणुकीमुळे नेत्यांच्या प्रचारातून गायब झाला असला तरी प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. ३३७ गावांमध्ये ४४३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्याच्या बाहेर चारा नेण्यास बंदी घातली आहे. जिल्ह्यातील खुलताबाद व सोयगाव या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता सात तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. यात जिल्ह्यातील एकूण २६९ गावे व ४८ वाड्यांना सध्या ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सरू आहे.

प्रशासनाचे नियोजन काय?

आगामी काळातील परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने चारा जिल्ह्याबाहेर विक्रीस, वाहतुकीस बंदी घातली आहे. दरम्यान, काही भागांतून चारा छावणी सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत पशुधन अधिकारी यांना संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, वस्तुनिष्ठ अहवालानंतर याबाबत पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली.जिल्ह्यात पशुधन किती?

पशुगणनेप्रमाणे जिल्ह्यात लहान १ लाख ५८ हजार २५१ तर मोठी ४ लाख ७४ हजार ७५२, असे मिळून एकूण ६ लाख ३३ हजार ३ जनावरे आहेत. त्यांना प्रतिदिन ३ हजार ३२३ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यक आहे. प्रशासनाने ४ ते ५ महिने पुरेल, एवढा चारा असल्याचा दावा केला आहे.

टॅग्स :चारा घोटाळाऔरंगाबादपाणी टंचाई