जळगाव : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशावर कायम आहे. त्यामुळे प्रकल्पासह भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील ३७ गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. २८ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील ७ गावांना ८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ३१ गावात विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके जाणवणार नाहीत, असा अंदाज होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशापर्यंत पोहोचला आहे. टंचाईच्या गावात टँकर, विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडून उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी नियोजन केले गेले आहे.
टंचाईच्या तीव्रतेचा विचार करून उपाययोजना म्हणून या गावांसाठी टँकर, कूपनलिका, विंधन विहिरी अधिग्रहण करण्यावर भर दिला जाते आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली.
प्रशासनाचे नियोजन, आठ टँकरसह ३१ विहिरींचे अधिग्रहणएप्रिल अखेरीस या टँकरसह अधिग्रहीत विहिरींच्या संख्येत वाढ झाल्याने मे महिन्यात पाणीटंचाईच्या चटक्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात २ गावांसाठी ३ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, या आठवड्यात टँकरची मागणी वाढली आहे.
त्यानुसार चाळीसगाव तालुक्यात ३ गावांसाठी प्रत्येकी एक, अमळनेर तालुक्यात २ गावांसाठी ३ टँकर, जामनेर, भडगाव तालुक्यात प्रत्येकी १ गावासाठी १ टँकर अशा सात गावांसाठी ८ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जामनेर तालुक्यात ६, एरंडोल १, मुक्ताईनगर, चाळीसगाव व पाचोऱ्यासाठी प्रत्येकी चार, अमळनेर ८, पारोळा ४ अशा ३१ गावांसाठी ३१ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय जळगाव तालुक्यात नवीन विंधन विहिरीसाठी मान्यता देण्यात आली असल्याचेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
धरणांमधील जलसाठ्यात घटमागील १५ दिवसात जिल्ह्यात धरणसाठ्यांमध्ये ५ ते ७टक्क्यांनी घट आली आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील मोठ्या गिरणा, वाघूर व हतनूर या तीन धरणांमध्ये ४३.९६ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा एकूण १७ प्रकल्पांमध्ये अवघा ३५.२० टक्के जलसाठा आहे.