Join us

Warehousing Corporation : शेतमाल ठेवण्यासाठी कुणी जागा देता का जागा....... काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 16:43 IST

वखार महामंडळाच्या गोदाम शेतमालाची साठवणूक केली जाते. यंदा याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने गोदाम फुल्ल झाले आहे. कसे ते वाचा सविस्तर (Warehousing Corporation)

Warehousing Corporation :  पणन महासंघाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात कारंजा वगळता मालेगाव, मंगरुळपीर, वाशिम आणि रिसोड या ठिकाणी असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामात आता पुरेशी जागा नसल्याने हमीभाव केंद्रांतील खरेदी प्रभावित होत आहे.

शेतमाल मोजणीवर मर्यादा येत असून, केंद्र चालकांसह शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद, सोयाबीनची 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ 'कडून खरेदी केली जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ५ हजार २२७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

येथे होते शेतमालाची खरेदी

जिल्ह्यात विदर्भ कृषी पणन व प्रक्रिया सहकारी संस्था (अनसिंग), संत गजानन महाराज नावीन्यपूर्ण सहकारी संस्था, वाशिम आणि रिसोड, मालेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संस्था (मालेगाव) आणि ए. जे. कारंजा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी (कारंजा) या संस्थांना हमीदराने मूग, उडीद आणि सोयाबीन हा शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता हमीभावाने खरेदी सुरू असताना वखार महामंडळाच्या काही गोदामात माल साठविण्यासाठी पुरेशी जागा उरली नाही.

गोदामे भाड्याने घेण्याची तयारी

* वाशिम जिल्ह्यात सद्यः स्थितीत व्यापाऱ्याऱ्यांसह शेतकरीही वखार महामंडळाच्या गोदामात मालाची साठवण करीत आहेत. यात शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.

* आता जिल्ह्यातील कारंजा वगळता इतर चारही ठिकाणी वखार महामंडळाची पुरेशी जागा उरली नसल्याने शासकीय केंद्रांच्या खरेदीवर परिणाम होऊ नये म्हणून गोदामे भाड्याने घेण्याची तयारी वखार महामंडळाने केल्याची माहिती आहे.

वखार महामंडळाच्या गोदामात

शासकीय खरेदी केंद्रांचा शेतमाल साठविण्याची सोय आहे. त्यांच्याकडून येणारा माल थांबविला जात नाही. तथापि, पुढे साठवणुकीची गंभीर अडचण उद्भवू नये म्हणून खासगी गोदामे भाड्याने घेण्याचीही तयारी आहे. - पी. बी. बागडे, व्यवस्थापक, वखार महामंडळ, वाशिम

वखार महामंडळाच्या गोदामाची साठवण क्षमता (मेट्रिक टन)    

गोदाम  साठवण क्षमता (मेट्रिक टन)
वाशिम९७९०
मंगरुळपीर     ७९००
कारंजा           ७९००
मालेगाव          ४७२०
रिसोड            २०००
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसोयाबीनमूग