अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अर्ली द्राक्षांची निर्यात थांबली आहे. बागलाण भागातून या आठवड्यात ५० ते ६० कंटेनर रशियासाठी रवाना होणार होते. मात्र, स्टोअरेजमध्ये द्राक्षांना क्रैगिंग जाण्याची भीती तसेच तयार होण्याच्या मार्गावर असलेल्या द्राक्ष मालाला बसलेला अवकाळीचा फटका यामुळे निर्यातीला ब्रेक बसला आहे. निर्यात सुरू होण्यास अजून दोन आठवडे लागतील, अशी माहिती द्राक्ष निर्यातदारांनी दिली. मात्र, दुसरीकडे सध्या पडत असलेल्या दाट धुक्यामुळे द्राक्षमण्यांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण तयार होत आहे. एकूणच काय तर, द्राक्ष बागायतदारांसमोर संकटाचे वादळ घोंगावत राहणार असल्याचे दिसते. राज्यातील ९१ टक्के द्राक्ष निर्यात नाशिक जिल्ह्यातून होते.
सन २०२३-२४ या वर्षासाठी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षबागेची ऑनलाइन नोंदणी दि. ३१ डिसेंबरपर्यंत करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
द्राक्ष निर्मितीला चालना देण्यासाठी राज्यात निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी, तपासणी, कीड व रोगमुक्त हमी, अंगमार्क प्रमाणीकरण, फायटोसॅनिटरी प्रमाणीकरण या सर्व बाबींचे अपेडाच्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणालीद्वारे प्रभावीपणे अंमलबाजवणी करण्यात येत आहे. राज्यात द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा अग्रेसर आहे. युरोपियन युनियन व इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता कीड व रोगमुक्त, उर्वरित अंश हमी देण्यासाठी सन २००४ पासून राज्यात अपेडाच्या सहकार्याने ग्रेपनेटप्रणालीद्वारे नोंदणी करण्यात येते. सन २०२२-२३ मध्ये ३१ हजार ८११ निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात आली आहे. ढगाळ वातावरण व गारपिटीमुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
४४ हजार ६०० नोंदणीचे लक्षांक
■ निर्यातीसोबतच स्थानिक बाजा- रपेठेत ग्राहकांना कीड व रोगमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी सन २०२३-२४ साठी जिल्ह्याला ४४ हजार ६०० द्राक्षबागांची नोंदणीचे लक्षांक देण्यात आले आहे.
■ या वर्षात जिल्हास्तरावर कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या केंद्रात नोंदणी कशी करावी, यासंदर्भात माहिती नियुक्त्त अधिकारी देतील.