खरीप आणि रब्बी असे शेतीचे मुख्यत्वे करून दोन हंगाम असतात. विशेषतः कोरडवाहू शेतीमध्ये खरीप अत्यंत महत्त्वाचा हंगाम. पाऊस झाला की एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विविध पिकांच्या पेरण्या सुरू होतात. नत्र स्फुरद पालाशयुक्त खते पेरणीच्या वेळेस वापरली जातात आणि फक्त नत्र या खतासाठी युरिया मोठ्या प्रमाणात वापरतात.
एकाच वेळेस हंगाम सुरू असल्यामुळे या खताला साधारण एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण होते. कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पाऊस नेहमीपेक्षा खूप आधी चालू झाला. त्यामुळे पिकांच्या पेरण्यादेखील वेळेपेक्षा आधीच झाल्या आहेत. अशा परिस्थितीत अचानक युरिया खताला मागणी वाढते.
साधारण दरवर्षीच जून, जुलैमध्ये खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. तेव्हा याचा फायदा घेऊन खत उत्पादक कंपन्या दरवर्षीच त्यांच्या डिलर्स व किरकोळ विक्रेत्यांना, युरिया खताबरोबर कंपन्यांची कमी मागणी असलेली इतर विविध उत्पादने, जसे की बायो फर्टिलायझर्स, मायक्रो न्यूट्रियंट युक्त खते, केव्हा केव्हा शेतीला फारशी उपयुक्त नसलेली, परंतु उत्पादकांना व विक्रेत्यांना भरपूर नफा मिळवून देणारी उत्पादने हे, युरिया खताबरोबर घेण्याचे आवश्यक करतात आणि मग ही डीलर्स मंडळी, जसं कंपनीकडून आवश्यक होतं तसं शेतकऱ्यांनासुद्धा आवश्यक करतात.
यामुळे शेतकऱ्याला एक प्रकारची दादागिरी सहन करावी लागते आणि नको असलेली खतेदे खील घ्यावी लागतात. मुक्त अर्थव्यवस्था जागतिकीकरण, Free Trade हे शब्द फक्त शहरी माणसांसाठी. शेतीसाठी मात्र दादागिरी. हे शेतकऱ्याचे खरे दुःख आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक अडचणी आहेत.
जेव्हा शेतीतून तयार झालेला शेतमाल बाजारात विक्रीसाठी नेतात, तेव्हादेखील बाजारात त्याला कमीत कमी दर मिळावा यासाठी व्यापारी/खरेदीदार एकत्र येऊन प्रयत्न करतात. जर मागणीपेक्षा जास्त शेतमाल, बाजारात जेव्हा विकायला येतो अशा वेळेस व्यापारी खरेदीदार यांची दादागिरी चालते. शेतमालाच्या किमती पाडून मागतात.
काही वेळा शेतकऱ्यास खासगी सावकाराकडून कर्ज घेण्यास भाग पडते अशा वेळेसदेखील त्याची अडवणूक केली जाते. बरेच वेळा ओला शेतमाल आहे किंवा प्रत असमाधानकारक आहे म्हणूनदेखील काही वेळा अव्वाच्या सव्वा घट दाखविली जाते.
शेतकरी कधी म्हणतो का..?
बाजारात अन्नधान्याचे किंवा भाजीपाल्याची टंचाई असते तेव्हा शेतकरी असे काही कधीच म्हणत नाही की तुम्हाला भात पाहिजे असेल तर माझ्याकडचा नाचणासुद्धा तुम्ही घेतलाच पाहिजे. केव्हा माझ्या कोथिंबिरीच्या पेंडीबरोबर माझ्याकडची एक अंबाडीची पेंडी तुम्हाला घ्यावीच लागेल.
कारवाई मात्र नगण्यच...
• जेव्हा युरियाबरोबर लिंकिंग केले जाते त्याचा बंदोबस्त किंवा कायदेशीर कारवाई फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर अॅक्ट त्याशिवाय ग्राहक संरक्षण कायद्यानुसार होऊ शकते. जिल्हा कृषी अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी व विहित सरकारी अधिकारी यांना कायद्याने अधिकार आहेत.
• पण, अशा वेळेस हे अधिकारी कोठे गायब होतात हे शोधूनच काढले पाहिजे. कायदेशीर कारवाई केल्याची उदाहरणे हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढीसुद्धा नाहीत.
चंद्रशेखर यादवकोल्हापूर
हेही वाचा : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप