तजमूल पटेलकोळवण : पुणे जिल्हा व महाराष्ट्रमधील सर्व तालुक्यांतील भूमिअभिलेख कार्यालयात मोजणी अर्ज दाखल करताना नवीन अपडेट करण्यात आलेल्या व्हर्जन २ सॉफ्टवेअरमध्ये शेतकऱ्यांच्या ताब्यातील व नावावर असलेल्या पैकी जमीन मिळकती व काही ठिकाणी संपूर्ण क्षेत्र असलेला सातबारा सुद्धा मोजणी करता येत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
जमीन अकृषिक करणे, गुंठेवारी करणे, पोट हिस्से असलेल्या सातबारा मोजणी करता न येणे, प्लॅन मंजूर करणे, शेतकऱ्याचे ताब्यातील असलेल्या जमिनीचे हद्दीचे वाद अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
जिल्ह्यातील भूमिअभिलेखच्या अधिकृत वेबसाइटवरती शेतकरी वर्गाला आपल्या जमिनीच्या वहिवाटीची मोजणी करण्यासाठी कोणताही पर्याय ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जमिनीची मोजणी करता येत नाही.
वाढते शहरीकरण होत असताना अकृषिक जमीन करण्यासाठी जागेची मोजणी आवश्यक असताना मोजणी कार्यालयाकडून मोजणी होत नाही.
शेतकरी शासकीय फी भरण्यास तयार असून, या वहिवाटीच्या व इतर मोजण्या या पूर्वी भूमिअभिलेख कार्यालयाकडून करण्यात येत होत्या; परंतु आत्ता तसे होत नसल्याने शेतकन्यांवरती अन्याय होत आहे. काही ठिकाणी सातबारा पोट हिस्से झालेले आहेत अशा जमिनीची सुद्धा मोजणी करणे अवघड झाले आहे.
सातबाराची गुंठेवारी मोजणी होत नाही, नवीन आलेल्या व्हर्जन-२ मध्ये एखाद्या शेतकऱ्याने मोजणीला हरकत घेतल्यास त्याचा तपशील साइटवरती नोंदविण्यासाठी पर्याय नाही असे अनेक दुरुस्त्या करणे आवश्यक आहे. असे स्वराज्य पक्षाच्या वतीने मुळशी तालुका अध्यक्ष राजू फाले यांनी भूमिअभिलेख कार्यालय यांना दिलेल्या निवेदनातून मांडण्यात आलेले आहे.
वहिवाट मोजणीद्वारे वाद होते मिटत काही गावाची मोजणी फाळणीबारा, सर्व्हे नंबर नकाशा, गट नकाशा, स्कीम उतारा, अशा वेगवेगळ्या पर्यायावरून मोजणी करावी लागते एखाद्या गावाला फक्त स्कीम उत्तारा उपलब्ध आहे व बाकीचे काहीच रेकॉर्ड नाही अशावेळी वहिवाट मोजणीद्वारे कार्यालयास मोजणी करावी लागते त्यामुळे वहिवाट मोजणीद्वारे नागरिकांचे अनेक शासकीय तसेच जमिनीचे वाद असलेले विषय मिटत होते.
व्हर्जन-२ मधून अर्ज करताना वहिवाटीची मोजणीचा पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्गात अत्यंत रोष निर्माण झाला आहे. भूमिअभिलेख कार्यालयाकडून तत्काळ दखल घ्यावी; अन्यथा आंदोलन उभे करू. - राजू फाले, अध्यक्ष, स्वराज्य पक्ष
अर्ज करताना अडचणी येत आहेत तसे व्हर्जन २ सिस्टममध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू असे. - स्वप्ना पाटील, उपअधीक्षक, भूमिअभिलेख, मुळशी
अधिक वाचा: Satbara Utara : ५० वर्षानंतर सातबारा उताऱ्यात झाले हे मोठे बदल; वाचा सविस्तर