Join us

देशी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या वापरा अन् गोमय होळी साजरी करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 3:43 PM

होळी पेटविण्यासाठी सार्वजनिक लाकडांचा, तसेच गोवऱ्यांचा वापर केला जातो, परंतु या ठिकाणी, तसेच घरोघरी, घरच्या परिसरात होळी गोमय करण्यासाठी ...

होळी पेटविण्यासाठी सार्वजनिक लाकडांचा, तसेच गोवऱ्यांचा वापर केला जातो, परंतु या ठिकाणी, तसेच घरोघरी, घरच्या परिसरात होळी गोमय करण्यासाठी देशी गायींच्या शेणापासून केलेल्या गोवऱ्या बाजारात आल्या आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या गोवऱ्या होलिका पूजनात वापरण्याचे आवाहन बीड येथील पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

दिवसेंदिवस पशुधन कमी होत चालल्याने गोवऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. यात शहरीकरणाचीही भर पडली आहे, परंतु सामाजिक भावनेतून गोप्रेमी लोकसहभागातून गोशाळा चालवून संवेदना जपत आहेत, तर काही जण केवळ देशी वंशाच्या जनावरांचे पालन करीत वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल करीत आहेत.

बीड येथील श्रीक्षेत्र रामगड परिसरातील गोवर्धन गोशाळेतील गायींच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या बाजारात काही ठिकाणी विक्रीस आल्या आहेत, तर चौसाळा भागातूनही काही गोपालकांनी खास होळीसाठी गोवऱ्या विक्रीला आणल्या आहेत. गोमय होळीसाठी देशी गायींच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्यांना मागणी आहे.

शेतकऱ्यांच्या दावणीला गावरान गायी दुर्मीळ; संकरित गायी अन् म्हशीची संख्या वाढली

गोमय होळीचे फायदे

होळीला गोवऱ्या वापरल्याने झाडे वाचतील, उत्तम गोसेवा घडेल, देशी गायीचे महत्त्व वाढेल, पर्यायाने गायी वाचतील. गोवरीत २७ टक्के प्राणवायू असतो व शेणात किरणोत्सर्गाला (रेडियशनला) शोषून घेण्याची शक्ती असते. गोमय भस्मात ४६.०६ टक्के प्राणवायू असतो व राख, खत व कीडनाशक म्हणून गोवरीचा वापर करता येतो.

गोवरीच्या धुरामुळे विषारी जंतू नष्ट होऊन वातावरण शुद्ध होते. धार्मिक विधी, होम हवन, यज्ञामध्ये गायीच्या गोवऱ्यांवर एक तोळा गायीच्या तुपाचे हवन केल्याने एक टन प्राणवायू निर्मिती होते, (ओझोन) ची कमतरता भरून काढली जाते. गायीच्या शेणाइतके चांगले जंतुनाशक दुसरे नाही. त्यामुळे होळीसाठी पर्यावरण रक्षणासाठी गाईच्या गोवऱ्याच वापराव्यात, असे जाणकार सांगतात.

टॅग्स :सांस्कृतिकशेतीदुग्धव्यवसायहोळी 2024