Join us
Daily Top 2Weekly Top 5

युरियाचा भेसळीसाठी वापर; सहाशे रुपयांच्या युरियाची विक्री होते ३५०० रुपयाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:06 IST

Urea Scam शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अनुदानित दराने युरिया पुरवला जातो. जिल्ह्यात वर्षाला लाखो टन युरिया येतो, पण शेतकऱ्यापर्यंत जाण्यापूर्वीच तो युरिया उद्योजकांना काळ्या बाजाराने विक्री होतो.

अशोक डोंबाळेसांगली : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अनुदानित दराने युरिया पुरवला जातो. जिल्ह्यात वर्षाला लाखो टन युरिया येतो, पण शेतकऱ्यापर्यंत जाण्यापूर्वीच तो युरिया उद्योजकांना काळ्या बाजाराने विक्री होतो.

सहाशे रुपये क्विंटलने शेतकऱ्यांसाठी मिळणारा युरिया उद्योजकांना तीन हजार ५०० रुपये दराने विक्री होत आहे. यात उद्योजक आणि घोटाळेबाज मालामाल होत असून, शेतकरी कंगाल होत आहेत.

शेती वापराचा अनुदानित निमकोटेड नामांकित कंपन्यांचा युरिया औद्योगिक कारणासाठी गैरमार्गाने वापर होत आहे. प्लास्टिक, रेझिन, पशुखाद्य, औषध निर्माण आणि ऑटोमोबाइल उद्योगासाठी युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

औद्योगिक नगरीची ही गरज ओळखूनच कमी भांडवलातील युरिया घोटाळ्याच्या रॅकेटमध्ये अनेक बेरोजगार तरुण अडकले आहेत. अनुदानीत युरिया औद्योगिक वापराच्या यूरिया बॅगेत भरून काळाबाजार होत आहे.

युरिया घोटाळ्यातील तरुणांच्या पाठीशी काही बड्या राज्यकर्त्याचे पाठबळ आहे. म्हणूनच युरिया घोटाळ्याबद्दल तक्रार आल्यानंतर जुजबी कारवाई करून कृषी विभागाचे अधिकारी रिकामे होतात.

प्रत्यक्षात युरियाचा वर्षाला कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होत असतानाही त्याच्या मुळापर्यंत कृषी विभागाचे अधिकारी कधीच गेले नाहीत.

कडेगाव येथील अनुदानीत युरिया औद्योगिक वापराच्या युरिया पोत्यात भरून मुंबई, ठाणे येथे विक्री होत होता. या प्रकरणात संबंधित व्यक्तीला अटक झाली. पण, या व्यक्तीला युरिया पुरवठा करणाऱ्यामध्ये काही मुख्य विक्रेते आणि दुकानदारांच्या नावाचा समावेश होता.

यातील कुणाचीच नावे अजिबात पुढे आली नाहीत आणि त्यांच्यावर कारवाईही झाली नाही. कुपवाड औद्योगिक वसाहतीत कारवाईसाठी पथक जाण्यापूर्वीच तेथून घोटाळेबाज गायब झाला होता.

सोमवार दि. २६ मे २०२५ रोजी सांगलीत पशुखाद्य तयार करणाऱ्या एका कंपनीवर छापा टाकून अनुदानीत युरिया साठा जप्त केला.

युरिया घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मोकाट ◼️ सांगलीतील युरियाचा गैरव्यवहार प्रकरणात 'केंद्रीय खत नियंत्रण आदेश १९८५'मधील तरतुदींचे उघडपणे उल्लंघन झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या खत दुकानदारांवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.◼️ पण, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून युरियाचा गैरव्यवहार करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालक, मुख्य विक्रेत्यांचा शोधच घेतला जात नाही.◼️ एखाद्याने तक्रार केली की, तेवढीच जुजबी कारवाई करून प्रकरणावर पडदा टाकण्याला कृषी विभागाचे प्राधान्य असते, म्हणूनच युरिया घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मोकाटच फिरत असून, घोटाळाही थांबण्याचे नाव घेत नाही.

घोटाळ्यास मिळतात कोणाचे आशीर्वादलाखो टन युरिया येऊनही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत युरिया पोहोचेल, याची खात्री कुणी देऊ शकणार नाही. वर्षभरापूर्वी कवठेमहांकाळ येथून दहा टनाचे प्रत्येकी दोन ट्रक युरिया सांगोला येथे निघाले होते. यातील एक ट्रक पकडला आणि दुसरा गायब झाला. चालकाला कुणाचा आशीर्वाद होता, असाही शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी आलेला २५ कोटींचा युरिया जातोय उद्योजकांच्या घशात; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

टॅग्स :खतेशेतीपीकसांगलीसेंद्रिय खतसरकारराज्य सरकार