Join us
Daily Top 2Weekly Top 5

UMED : लातूरच्या गोधडीची उब, मधाचा गोडवा चाखणार देश-विदेशातील प्रवासी कसे ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:20 IST

लातूरच्या तीन उत्पादनांची आता नागपूर विमानतळावर होणार विक्री आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. (UMED)

लातूर : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उत्पादने तयार केली जात आहेत. त्यापैकी तीन बचत गटांच्या उत्पादनांची विक्री आता विमानतळावरील स्टॉलद्वारे होणार आहे. त्यामुळे देश विदेशातील प्रवाशांपर्यंत लातूरची उत्पादने पोहोचणार आहेत.

'हिरकणी लातूर' या नावाने उत्पादनांची विक्री होणार आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमांतून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.

याच उपक्रमांचा भाग म्हणून राज्यातील उमेद अभियानातील निवडक बचत गटांच्या उत्कृष्ट उत्पादनांचे स्टॉल विमानतळावर प्रायोगिक तत्त्वावर लावण्याबाबत राज्य स्तरावरून उमेद अभियान व भारतीय विमान वाहतूक प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील पारंपरिक गोधडी, मध तसेच लाकडी खेळणी तयार करणाऱ्या बचत गटांच्या उत्पादनांची नागपूर विमानतळावर स्टॉलद्वारे विक्रीसाठी निवड करण्यातआली आहे.

जिल्ह्यातील उमेद बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांनी खुल्या बाजारपेठेत स्पर्धा करावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात पॅकेजिंग, ब्रेण्डिंगचे प्रशिक्षण, हिरकणी हाट प्रदर्शने आयोजित केली जात आहेत.

पारंपरिक गोधडी, मध, लाकडी बैलगाडीची निवड....

नागपूर विमानतळावरील स्टॉलवर विक्रीसाठी निलंगा तालुक्यातील अनसरवाडा दोधौल रूमा महिला बचत गटाचे उत्पादन असलेली पारंपरिक गोधड़ी, योगा मॅट, औसा तालुक्यातील आलमला येथील उत्कर्ष महिला बचत गटाचे उत्पादन असलेले निम हनी, जामून हनी, फॉरेस्ट हनी यासारखे विविध प्रकारचे मध आणि अहमदपूर तालुक्यातील उमरगा यल्लादेवी येथील संत ज्ञानेश्वरी महिला बचत गटाचे उत्पादन असलेली खेळण्यातील लाकड़ी बैलगाडी या उत्पादनांची निवड झाली आहे.

विमानतळावर स्टॉलद्वारे विक्रीसाठी निवड झालेल्या गटातील महिलांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी कौतुक केले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमहिला आणि बालविकासमहिलासरकारी योजना