Join us

गावागावांतील पारंपरिक यात्रा नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:37 AM

लोककला लोप पावल्याने यात्रांचा पारंपरिक बाज हरवला

बीड जिल्ह्याच्या गंगामसला परिसरातील यात्रा, उत्सवांना सुरुवात झाली आहे. मात्र, यात्रा पूर्वीसारख्या गजबजलेल्या दिसून येत नाहीत. उत्सवांच्या पद्धतीत मोठा बदल झाल्यामुळे यात्रा, उत्सव नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.

माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी, रोशनपुरी, गंगामसला, छत्रबोरगाव, आंबेगाव, गुंज येथे पूर्वी भरणाऱ्या उत्सवामधून मोठी उलाढाल होत असे. प्रत्येक संस्थानाला स्वतःच्या मालकीचे पशुधन असायचे. छोट्या संस्थानला वळू, जान्या गायी, तर मोठ्या गुंज संस्थानासारख्या संस्थानला हत्ती असे पशुधन त्यांची समृद्धी दाखवत असे.

यात्रा उत्सवात भक्त या पशुधनाच्या खाद्याची तरतूद करत असत. आता हे पशुधन नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच आता यात्रा उत्सवात येणारे बहुरूपी, खेळवाले, तमाशा मंडळे, फिरते चित्रपटगृहे, पारंपरिक मिठाईची दुकाने, विविध वस्तू विक्रेत्यांची दुकाने कमी दिसून येतात. त्यामुळे उरूस, जत्रा, यात्रा यांचा पारंपरिक बाज असणारा आत्मा हरवल्यासारखे चित्र दिसत आहे.

ऑनलाईनच्या या सध्याच्या जमान्यात आता घरपोहच सर्व मिळत असल्याने यात्रा उत्सवातील गर्दी देखील कमी प्रमाणात दिसून येते आहे. ज्यामुळे व्यापाऱ्यांनाही म्हणावे तसे ग्राहक मिळत नाहीत. तसेच पारंपरिक अनेक लोककला साजर्‍या करण्यासाठी पुढाकार घेतांना कोणी दिसून येत नाही. परिणामी गावागावांच्या लोककला लोप पावत असल्यामुळे यात्रा, उत्सवांना पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत.

हेही वाचा - शेळीपालनात उत्पन्नाची हमी; वर्षभर मागणी असलेला शेतीपूरक व्यवसाय

आमच्या पूर्वजांपासून मिठाईची दुकाने परिसरातील सर्व यात्रेमध्ये लावावी लागत असत. आता यात्रा उत्सवाला पूर्वीचे स्वरूप राहिले नाही. त्यामुळे मिठाईची दुकाने बंद करावी लागत आहेत. - पंढरीनाथ लांडगे, मिठाई विक्रेते, गंगामसला

व्यवसाय झाले ठप्प

आता सर्व गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. मात्र, यात्रोत्सवात सर्वांनी एकत्र येण्याचा आनंद ऑनलाइन मिळू शकत नाही. हे उशिरा का होईना लोकांच्या लक्षात येणार आहे. मात्र तोवर खूप काही लोप पावलेलं असेल. तसेच यात्रा उत्सवातील आजघडीला व्यवसाय ठप्प झाले आहेत. - दशरथ माने, हॉटेल व्यावसायिक, सुरूमगाव

टॅग्स :सांस्कृतिकग्रामीण विकासशेतकरी