Join us

यंदा भाताचे सव्वादोन लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 10:27 AM

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. जूनमध्ये पाऊस उशिरा सुरू झाला.

अलिबाग जिल्ह्यात जुलैच्या अतिपावसामुळे सुमारे नऊ हजार हेक्टर पीक क्षेत्र कमी झाले असून, प्रत्यक्ष १० हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड झाली. परतीचा पाऊस वाढल्यास फूलगळ होऊन भात उत्पादनात १५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. जिल्ह्यात यावर्षी भाताचे सुमारे २ लाख २५ हजार मेट्रिक टन उत्पादन होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी सुमारे २ लाख ५४ हजार मेट्रिक टन भात उत्पादन होते.

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. जूनमध्ये पाऊस उशिरा सुरू झाला. त्यामुळे शेतीच्या कामांनाही उशिरा सुरुवात झाली. उशिरा पेरणी करण्यात आली. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भातरोपे कुजली. लावणीसाठी रोपे कमी पडली. त्यामुळे १० हजार हेक्टर क्षेत्रावरच भातलागवड केली.

सप्टेंबर महिना ठरला पोषक- ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भातरोपे करपून नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु, सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडला. हा पाऊस शेतीला पूरक ठरला.- भातरोपांना नवसंजीवनी मिळाली. रोपे टरारून आली. भातरोपे पोटरीच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी हळवी भातशेती निसवायला सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात हळव्या भातपिकाचे ३० टक्के क्षेत्र आहे.

शेतकऱ्यांतील जनजागृतीचा परिणाम- गेल्या काही वर्षात भातपिकाचे क्षेत्र कमी होत चालले असले तरी उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने कृषी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.- शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.- अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या भाताच्या नव्या वाणाची माहिती देऊन त्यांची लागवड करण्यास प्रोत्साहित केले जाते.

रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांत गेल्या एक-दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. याचा हळव्या भातपिकावर परिणाम होऊ शकतो. जिथे कणीस आले आहे, ती पिके पडल्यास त्यांना मोड येऊ शकतात, तर फूल येण्याच्या अवस्थेतीत पिकांची फूलगळ होऊन उत्पादनात १० ते १५ टक्केपर्यंत घट होऊ शकते. जिल्ह्यातील भातपिकाच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी करण्यात येत आहे. - उज्ज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :शेतकरीअलिबागपीकपाऊसखरीपरायगड