Join us

टोमॅटो, पालक,मिरच्या शाळेच्या परसबागेत लावत मराठवाड्यातील या शाळेने काढलं नाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 12:09 PM

शासनाच्या परसबाग स्पर्धेत या शाळेचा पहिला नंबर

शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पीएम पोषण परसबाग स्पर्धेत दहिफळ भोंगाने पूर्व (ता. परतूर) शाळेने जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. या शाळेच्या आवारातील परसबागेमध्ये टोमॅटो, पालक, कोथिंबिरीसह इतर पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. हा भाजीपाला शालेय पोषण आहारासाठी वापरला जातो.शासनाच्या वतीने पीएम पोषण परसबाग स्पर्धेची घोषणा करण्यात आली होती. मागील पाच वर्षांपासून दहिफळ भोंगाने पूर्व जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मुख्याध्यापक पी.व्ही. म्हैसनवाड व शिक्षकांकडून पारसबागेची निर्मिती करून भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. सदरील परसबागचे नियोजन व अंमलबजावणीत विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या परसबागेत २४ प्रकारचा भाजीपाला लागवड करताना स्थानिक पातळीवरील भाज्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे मुलांचे आरोग्य सुधारत आहे. 

संपूर्ण परसबाग ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला जातो. हॅण्ड वॉश स्टेशनचे पाणी ही परसबाग व कंपोस्ट खताचा निर्मितीसाठी वापर होतो. याद्वारे मुलांना शेतीविषयक ज्ञान मिळते. सेंद्रिय परसबाग असल्याने विषमुक्त अन्न दररोज मुलांना शालेय पोषण आहारात मिळते. भाजीपाला कसा उत्पादित करावा, याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळते. या शाळेने परसबाग स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या शाळेने या स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला असून, राज्य स्पर्धेसाठी ही निवड करण्यात आली आहे. याबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यापुढेही शाळेत विविध उपक्रम राबविण्याचा मानस पालक, शिक्षकांनी व्यक्त केला.

ग्रामस्थ, पालकांचे सहकार्य आणि शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे सेंद्रीय परसबागेचा उपक्रम शाळेत यशस्वी ठरला आहे. जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला असून, राज्य स्पर्धेसाठी शाळेची निवड झाली आहे.-पी.व्ही. म्हैसनवाड, मुख्याध्यापक

ग्रामस्थांचेही सहकार्य

जिल्हा परिषद शाळेतील परसबागेसाठी शालेय समितीच्या पदाधिकारी, सदस्यांसह ग्रामस्थांचीही मदत मिळते. बागेची देखरेख ग्रामस्थ करतात. शिवाय शाळेतील मुलांना आवश्यक ती मदत करतात.

दहिफळ भोंगाने ग्रामस्थांच्या मदतीने आजवर शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. शिक्षक, ग्रामस्थांच्या मदतीतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लाभ होत आहे.

 

टॅग्स :भाज्याशाळाअन्नसरकारी योजना