पोस्ट ऑफिसने रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याची योजना महिनाभर पुढे ढकलली आहे. मंगळवारी यासंदर्भातील अधिसूचना टपाल संचालनालयाने संबंधित कार्यालयांना पाठवली आहे.
१ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या या निर्णयाची आता अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होईल. भारतीय पोस्टाची ही रजिस्टर्ड पोस्ट सेवा ५० वर्षांहून अधिक काळ सुरू आहे.
आता ही सेवा १ ऑक्टोबरपासून स्पीड पोस्टमध्ये विलीन होणार आहे. पोस्ट विभागाने आपले कामकाज जलद, ट्रॅक करण्यास सोपे आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.
कमी खर्चात विश्वासार्ह सेवा वापरणाऱ्या काही ग्राहकांसाठी नोंदणीकृत टपालसेवा बंद होणे हे निराशाजनक ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना नवीन सेवेचा खर्च जास्त वाटू शकतो.
पोस्टाने सरकारी विभाग, न्यायालये, विद्यापीठे आणि इतर संस्थांना १ सप्टेंबरपूर्वी त्यांच्या सेवा स्पीड पोस्टवर हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते.
काही ठिकाणी काउंटरवरील अधिकाऱ्यांकडून नोंदणीकृत पत्र स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याचे टपाल संचालनालयाच्या निदर्शनास आले.
ही बाब आक्षेपार्ह असून काउंटरवर नोंदणीकृत पत्रांची बुकिंग सुरूच आहे आणि ती बंद केलेली नाही, असा खुलासा टपाल विभागाने केला. दरम्यान, ऑक्टोबरनंतर पोस्टाच्या या विलीनीकरणामुळे पोस्ट सेवा महाग होणार आहे.
स्पीड पोस्ट सेवेची किंमत ५० ग्रॅमपर्यंत ४१ रु. पासून सुरू होते, रजिस्टर्ड पोस्ट २४.९६ रुपये, त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त २० ग्रॅमसाठी ५ रुपये अशी आहे. स्पीड पोस्टपेक्षा २० ते २५ टक्के ही सेवा स्वस्त आहे.
अधिक वाचा: ‘उमेद’ मधील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या 'या' १७ उत्पादनांना मिळणार जागतिक मार्केट