Join us

"आमच्या लोकांना हेच काम असतं'; पहिलीत शाळा सोडून मुलं थेट उसाच्या फडात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 16:21 IST

उसतोड कामगारांच्या मुलांच्या व्यथा...

पुणे : "आमच्या लोकांना हेच काम असतं आयुष्यभर, मला कळत नव्हतं तेव्हाच मी शाळा सोडली, मला वाटतंय पहिलीला असताना सोडली असेल. आणि त्यानंतर मी कायम उसतोडीच करतो"  हे वाक्य आहेत १३ वर्षाच्या उसाच्या फडातील एका मुलाचे. उत्तर महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रात उसतोडीसाठी आलेल्या कामगारांच्या मुलांच्या या व्यथा आहेत.

पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उसतोड कामगार उसतोडीसाठी येत असतात. पण सरकारकडून या स्थलांतरित कामगारांचे प्रश्न पाठीशी घातले जातात. कामासाठी आईवडिलांनी स्थलांतर केले तर नाईलाजाने लेकरांनाही स्थलांतर करावे लागते कारण त्यांना सांभाळणारे कोण नसते. उसाच्या फडातील लेकरांसोबत लोकमत अॅग्रोच्या प्रतिनिधींनी संवाद साधला त्यावेळी भीषण वास्तव समोर  . 

उसतोड पट्ट्यातील अनेक मुले अशिक्षित असतात.  ते मुलींनाही जास्त शिकवत नाहीत आणि या मुलींचे बालविवाह केले जातात. अनेक मुलांनी प्राथमिक शिक्षण न घेताच शाळा सोडून दिल्या आहेत. यामुळे या तरूणांचे भविष्य अंधारमय झाले आहे असं मत या कामगारांनी व्यक्त केलंय.

या कामगारांतील एका महिलेला दोन मुले आहेत. तर तिचा नवऱ्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू पावला आहे. नवरा नसल्यामुळे मुलांचा सांभाळ करण्यासाठी या महिलेला नाईलाजाने उसतोडी करावी लागत आहे. त्यामुळे तिच्या १२ ते १३ वर्षांच्या असलेल्या दोन्ही मुलांचे शिक्षण सुटले असून पहिलीत असतानाच त्यांचे शिक्षण सुटल्याचं ते सांगतात. 

हे वास्तव खूप भयंकर असून हा कामगार वर्ग शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे तरूण पिढीचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर सरकारने उसतोड कामगारांच्या मुलभूत सुविधेंकडे लक्ष द्यायला पाहिजे अशी मागणी या कामगारांनी केली आहे.  

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी