Join us
Daily Top 2Weekly Top 5

कापूस, सोयाबीनसह इतर तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी हे निर्देश..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 11:37 IST

मूल्य साखळी विकास कार्यक्रम आढावा बैठक बुधवारी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

कापूससोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम राबविण्यास गती द्यावी.या कार्यक्रमांसाठी आणखी निधीची गरज भासल्यास तो निधी ही उपलब्ध करून देण्यात येईल. असेही ते म्हणाले.

राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम आढावा व सन २०२४-२५ आराखड्यास मान्यतेबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुंडे बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, वित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर, कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड, कृषी आयुक्त कार्यालयाचे संचालक दिलीप झेंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुंडे म्हणाले, एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रमात सोयाबीन या पिकाचा २६ जिल्ह्यांत समावेश आहे तर २१ जिल्ह्यात कापूस पिकांचा समावेश आहे.

ही योजना समूह आधारित आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापर वाढविण्यासाठी त्यांचा प्रचार व प्रसार करावा. तसेच सन २०२४-२५ च्या पीक प्रात्यक्षिकांच्या पॅकेज मध्ये सुद्धा नॅनो युरिया व नॅनो डीएपी समावेश करण्यात येणार आहे. देशामध्ये नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरण्यात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी विभागाने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देशही मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले.

टॅग्स :कापूससोयाबीनधनंजय मुंडे