Join us

वाळवण मधून धान्यांचे मूल्यवर्धन करून उभारला जाऊ शकतो शेतीपूरक रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 14:05 IST

उन्हाळा लागला की, खेडोपाडी किंवा छोट्या गावात वाळवण करणे म्हणजे आजही एक उत्सव मानला जातो. प्रत्येकाच्या गच्चीवर काहीतरी किवा अंगणातील एखाद्या कोपऱ्यात बाज टाकली जाते आणि त्या बाजेवर हे पदार्थ वाळत घातल्याचे दिसून येते.

हुसैनखॉ पठाण

'अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर' .. या संत बहिणाबाईंच्या कवितेप्रमाणेच महिलांना घरात काय हवं, काय नको, याची नेहमी चिंता असते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहुल लागताच विविध प्रकारचे वाळवण करण्याची लगबग सुरू होते.

यात बटाट्याचे वेफर्स, बट्ट्याचा कीस, उपवासाचे पापड, गव्हापासून शेवई, कुरडई, बाजरीपासून खारोडी, ज्वारीपासून खारोडी, पापड, तांदूळ आणि उडदापासून पापड, चकल्या, मुगाच्या डाळीपासून मुगवड्या, बटाट्यापासून चकल्या आदी पदार्थ वर्षभर पुरतील या बेताने तयार केले जातात.

हे पदार्थ बनवण्यासाठी आजूबाजूच्या महिला एकत्र येऊन मदत करून 'आला आला उन्हाळा, आता सांडगे (मुंगवड्या) - पापड घाला, कुटा-कुटा मसाला, लोणचे-मुरांबे घाला' अशी एकमेकींना हाकही देत असल्याचे दिसून येते.

दुपारच्या उन्हाळी नाष्ट्यासाठी या पदार्थाचा वापर होतो. हे पदार्थ वर्षभर घरात असावेत, यासाठी महिलांची धडपड असते. आता तर वाळवणीचे पदार्थ बनविण्यासाठी शहरात उद्योग सुरू आहेत. बचत गटांच्या माध्यमातून बनवलेले रेडिमेड पदार्थ बाजारात मिळत असल्याने अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

परंतु, ग्रामीण महिला हे पदार्थ घरीच बनवण्याला पसंती देतात. पूर्वी शेवया फळी पाठावर किंवा हातावर तयार केल्या जात होत्या. आता मशीनद्वारे हे पदार्थ तयार करणे सोपे झाले आहे. एवढेच नव्हे तर या पदार्थांतून अनेकींना रोजगारही मिळू लागला आहे.

कमी खर्चामध्ये बनतात वर्षभराच्या कुरडया 

सर्वात अगोदर गहू काडीकचर्‍यापासून स्वच्छ करून पाण्याचे धुवून ५ ते ६ दिवस एका भांड्यात भिजू घातला जातो. त्यानंतर ते गहू मिक्सरमधून बारीक करून घेतल्यावर पुन्हा एका डब्यात रात्रभर ठेवून दिले जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी चुलीवर एक मोठे पातेले ठेवून त्यात पाणी आणि मीठ टाकून हे द्रावण चांगले शिजू दिले जाते.

त्यानंतर परिसरातील महिलांना बोलावून एका बाजावर साचाच्या माध्यमातून टाकल्यानंतर कुरडया तयार होतात. यासाठी जास्त खर्च लागत नाही, वर्षभराच्या कुडाया बनवण्यासाठी किमान ८-१० किलो गहू लागतात. - गयाबाई रामराव शिरसाठ, वाकडी

खेड्यात वाळवण म्हणजे एक उत्सव

उन्हाळा लागला की, खेडोपाडी किंवा छोट्या गावात वाळवण करणे म्हणजे आजही एक उत्सव मानला जातो. प्रत्येकाच्या गच्चीवर काहीतरी किवा अंगणातील एखाद्या कोपऱ्यात बाज टाकली जाते आणि त्या बाजेवर हे पदार्थ वाळत घातल्याचे दिसून येते.

वाळवण मधून धान्यांचे मूल्यवर्धन करून उभारला जाऊ शकतो शेतीपूरक उद्योग 

दिवसेंदिवस शेतीतील उत्पादन कमी होत आहे. सोबत बाजारदरांची हमी नसल्याने अपेक्षित उत्पन्न हाती राहत नाही. तसेच उन्हाळ्यात शेती कामे ही फार काही नसल्याने शेतकरी गृहिणीने आपल्या परिसरातील काही महिलांना सोबत घेऊन उन्हाळी वाळवण पदार्थ निर्मिती व विक्री केली तर यातून त्यांच्या शेतातील गहू, ज्वारी, बाजारी, तांदूळ, उडीद, मुग आदींचे मूल्यावर्धन होऊ शकेल. तसेच उन्हाळ्यात रोजगार मिळेल.  

टॅग्स :शेतीशेतकरीशेती क्षेत्रज्वारीगहूबटाटा