Join us

Sugar Factory : अजूनही गाळपाचे परवाने नाहीत; साखर कारखाने सुरू होण्याचा पेच वाढला!

By दत्ता लवांडे | Updated: November 12, 2024 21:45 IST

उसतोड कामगारांचे स्थलांतर होऊन मतदानाचा आकडा कमी होण्याची भिती असल्यामुळे उसतोड कामगार बहुल भागातील नेत्यांनी उसाचा गाळप हंगाम पुढे ढकलण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Pune : गाळपाची तारीख दोन दिवसांवर आली असतानाही साखर आयुक्तालयाकडून अद्याप एकाही साखर कारखान्यांना गाळपाचे परवाने गेले नसल्यामुळे साखर गाळप हंगाम सुरू होण्यासंदर्भातील पेच आणखी वाढला आहे. राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाळप हंगाम १५ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबर रोजी सुरू करण्याच्या हालचाली राज्यस्तरावर चालू आहेत. 

दरम्यान, उसतोड कामगारांचे स्थलांतर होऊन मतदानाचा आकडा कमी होण्याची भिती असल्यामुळे उसतोड कामगार बहुल भागातील नेत्यांनी उसाचा गाळप हंगाम पुढे ढकलण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पण विस्मा आणि काही राजकीय नेत्यांनी १५ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू करण्यासंदर्भात भूमिका घेतली आहे. 

हिवाळ्यात सुरू होणारे साखर कारखाने अजून पुढे ढकलले तर उन्हाळ्यात हा हंगाम लांबणार आहे. यामुळे साखर कारखान्यांचे आणि उसतोड कामगारांचे नुकसान होणार आहे. कारखान्यांनी मतदानासाठी एक दिवस कारखाने बंद ठेवण्याची तयारी दर्शवली आहे, त्यामुळे गाळप हंगाम १५ नोव्हेंबर रोजी सुरू करण्याची मागणी विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केली आहे. 

मागच्या वर्षीचा म्हणजे २०२३-२४ चा गाळप हंगाम १ नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता. यंदा २५ नोव्हेंबर रोजी साखर कारखाने सुरू झाले तर मे महिन्याच्या सुरूवातीपर्यंत साखर कारखाने सुरू राहतील. यंदा उसाखालील क्षेत्र १ लाख हेक्टरने कमी असले तरी पाऊस चांगला झाल्याने उसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरी