Join us

घाटमाथ्यावरील खानापूर गाव द्राक्ष निर्यातीतून करतंय कोट्यांची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 11:50 AM

निर्यातक्षम द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या खानापूर घाटमाथ्यावरील द्राक्ष निर्यातीला मार्च महिन्यात गती आली आहे.

संदीप मानेखानापूर : निर्यातक्षम द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या खानापूर घाटमाथ्यावरील द्राक्ष निर्यातीला मार्च महिन्यात गती आली आहे. पाण्याची कमतरता, अवकाळीचा फटका, मजुरांची कमतरता, औषधांचे वाढलेले दर अशा अनेक संकटांचा सामना करत घाटमाथ्यावरील शेतकरी निर्यातक्षम द्राक्षे तयार करत असतो.

ही द्राक्ष युरोपसह आखाती देशात निर्यात केली जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पळशी द्राक्ष निर्यातीत आघाडीवर आहे. यावर्षी पळशीतून सर्वाधिक शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे.

द्राक्ष निर्यात शेतकऱ्यांची संख्या व क्षेत्र पुढीलप्रमाणे, पळशी ५०५ शेतकरी (२११ हेक्टर क्षेत्र), हिवरे १२५ शेतकरी (७१ हेक्टर क्षेत्र), बलवडी खा. ८६ शेतकरी (५१ हेक्टर क्षेत्र), बेनापूर ५३ शेतकरी (२६ हेक्टर क्षेत्र) खानापूर घाटमाथ्यावरील सर्व गावातील मिळून ८३७ शेतकऱ्यांनी युरोप द्राक्ष निर्यातसाठी नोंदणी केली असून, सुमारे ४१० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष निर्यात केली जाणार आहेत.

द्राक्ष निर्यातीमध्ये दरवर्षीपेक्षा यावर्षी जरी वाढ झाली असली तरी सध्या युरोप निर्यातक्षम द्राक्षांचे दर ७० ते ८० रुपये किलो यादरम्यान असल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

दरवर्षीपेक्षा दाक्ष निर्यातीस यावर्षी पोषक वातावरण असले तरी दरामध्ये मात्र वाढ नाही. दाक्ष निर्मितीचा खर्च दरवर्षी वाढतच आहे. मात्र, दर दरवर्षी कमीच होऊ लागला आहे. साधारणपणे निर्यातक्षम द्राक्षाचा दर किलोस १०० ते ११० रुपये असल्यास शेतकऱ्यांना द्राक्ष शेती परवडते. त्यामुळे दाक्षांच्या दरावर दाक्ष कंपन्यांपेक्षा सरकारचे नियंत्रण असावे. - सूर्यकांत देवकर, दाक्ष बागायतदार, बलवडी

टॅग्स :द्राक्षेखानापूरशेतकरीफळेपीक