Join us

कोकणात ऊस लागवडीकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 13:41 IST

कोकणातील जमीन व हवामान ऊस पिकासाठी योग्य आहे. खरीप पिकाची कापणी झाल्यानंतर योग्य ओलावा असताना ऊस पिकाची लागवड करता येईल.

कोकणातील जमीन व हवामान ऊस पिकासाठी योग्य आहे. खरीप पिकाची कापणी झाल्यानंतर योग्य ओलावा असताना जमीन २५ ते ३० सेंटिमीटर खोल नांगरावी आणि त्या स्थितीत १५ दिवस तापू द्यावी. यानंतर ढेकळे फोडून जमीन तयार करावी. दुसरी नांगरट ऊस लागवडीपूर्वी एक महिना व पहिल्या नांगरणीचे विरुद्ध दिशेने करावी. या नांगरणी वेळी उसाला द्यावयाच्या हेक्टरी ५० गाड्यांपैकी २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. म्हणजे मातीत चांगले मिसळेल. ट्रॅक्टरच्या साहाय्याने रीजरने ९० सेंटिमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात व उरलेले शेणखत लागवडीपूर्वी सऱ्यांमध्ये सारखे पसरून टाकावे. जमिनीच्या उतारानुसार सऱ्यांची लांबी ठेवून आडवे बांध व पाट पाडावेत.

विद्यापीठाने उसाच्या को-७४०, को. एम.-७१२५ (संपदा), को-७२१९ (संजीवनी) आणि को-७५२७, को- ९२००५, को-८६०३२ या जातींची शिफारस केली आहे. कोकणात उसाची लागवड दि. १५ डिसेंबर ते दि. १५ जानेवारी या कालावधीत करावी. उसाची लागवड सरी वरंबा पद्धतीने करतात. या पद्धतीत मुख्यतः ओली व कोरडी लागवड असे दोन प्रकार आहेत. ओली लागवड मध्यम ते हलक्या जमिनीत करतात. या पद्धतीत सर्वांत प्रथम पाणी सोडून जमीन चांगली भिजल्यावर तीन डोळ्यांच्या कांड्या २.५ ते ५ सें.मी. खोलीपर्यंत पायाखाली दाबून लावाव्यात व कांडीवरील डोळे जमिनीच्या बाजूला राहतील याची दक्षता घ्यावी. भारी जमिनीसाठी कोरडी लागवड पद्धत अवलंबली जाते. या पद्धतीत प्रथम सरीमध्ये चर खोदून २.५ ते ५ सें.मी पर्यंत खोल बेणे मांडून मातीने झाकावे नंतर सऱ्या पाण्याने भिजवाव्यात.

अधिक वाचा: केळवलीतील विलास हर्याण यांचा कोकणात ऊस लागवडीचा यशस्वी प्रयोग

कोकणात बहुतांश जमिनीत ओली लागवड करता येते. ऊस लागवड रोपे तयार करून केली जाते. त्यासाठी उसाची रोपे एक डोळा पद्धतीने माती व शेणखत समप्रमाणात वापरून किंवा कोकोपिट आणि गांडूळखत समप्रमाणात घेऊन ५ ग्रॅम अॅझेंटोबॅक्टर जीवाणू संवर्धक प्रती कि. ग्रॅम मिश्रणाच्या प्रमाणात वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. जानेवारीतील लागवडीला मे महिन्यापर्यंत ९ ते १० दिवसाच्या अंतराने पाण्याच्या १५ पाळ्या द्याव्यात. ऊसामध्ये कमी कालावधीत तयार होणारी आंतरपिके घेता येतात. मूळा, लाल माठ, गवार, काकडी, कोथिंबीर पिके घेतली असता उसाच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम न होता अतिरिक्त उत्पन्न मिळते.

ऊस तोडणीउसाचे पीक ४ ते ५ महिन्यांचे झाल्यानंतर उसाची पक्की बांधणी करावी व मातीची भर द्यावी. त्यामुळे सरीच्या ठिकाणी वरंबा व वरंब्याच्या ठिकाणी सरी तयार होईल. भर देण्यापूर्वी शिफारशीप्रमाणे ४० टक्के नत्राचा हप्ता गाडून दिल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. साधारणपणे १५ जानेवारीपर्यंत लावलेला ऊस पुढील डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात तोडणीसाठी तयार होतो. उसाची पवचता पाहण्यासाठी ब्रिक्स हायड्रोमीटर अथवा हॅण्ड रिक्रॅक्टोमीटर या साधनांनी रसातील विद्राव्य पदार्थाचे प्रमाण पाहावे. हे प्रमाण १९ अंशापेक्षा जास्त झाल्यास तोडणी करावी.

टॅग्स :ऊसकोकणशेतकरीशेतीपीकखरीप