Join us

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा स्मृतिदिन, जाणून घेवूया त्यांचा जीवनपट

By बिभिषण बागल | Published: August 18, 2023 10:13 AM

वसंतराव नाईक हे महाराष्ट्रातील हरितक्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. 

वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते. नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. नाईक हे महाराष्ट्रातील हरितक्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या. वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीच जाणीव नव्हती तर, दूरगामी स्वरुपाच्या उपाययोजना सुद्धा त्यांनी केल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती.

१ जुलै १९१३:  यवतमाळ जिल्‍हातील पुसद तालुक्‍यातील गहुली येथे बंजारा जमातीच्‍या सधन शेतकरी कुटुंबात जन्‍म.

१९३३:  नागपूर येथील नील सिटी हायस्‍कूलमधून मॅट्रिक परीक्षा उत्‍तीर्ण.

१९३७:  मॉरिस कॉलेज, नागपूर (सध्‍याचे वसंतराव नाईक सामाजिक विज्ञान संस्‍था) येथून बी.ए. पदवी परीक्षा उत्‍तीर्ण.

१९४०:  नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून एल.एल.बी पदवी उत्‍तीर्ण.     

१९४१:  प्रारंभी अमरावतीचे प्रख्‍यात वकील कै. बॅ. पंजाबराव देशमुख हयांच्‍या बरोबर व नंतर पुसद येथे स्‍वतंत्रपणे वकिली व्‍यवसायास प्रारंभ, पुसद तालुक्‍यातील आदर्श ग्राम चळवळीत पुढाकार, त्‍यांच्‍या प्रयत्‍नांमुळे व तळमळीमुळे त्‍यांचे स्‍वत:चे गाव ‘गहुली’ हे आदर्श गाव बनले.

६ जुलै १९४१:  प्रतिष्ठित ब्राम्‍हण घराण्‍यातील कु. वत्‍सला घाटे यांच्‍याशी विवाह केला. हा वि‍वाह आंतरजातीय असल्‍यामुळे त्‍यांच्‍या बंजारा समाजात मोठी खळबळ उडाली. काही दिवस त्‍यांना वाळीत देखील टाकण्‍यात आले.

१९४६:  पुसद नगरपालिकेच अध्‍यक्ष म्‍हणून निवड. जुन्‍या मध्‍यप्रदेश राज्‍यात उपमंत्री म्‍हणून १९५२ मध्‍ये नियुक्ती होईपर्यत याच पदावर होते. ह्या अवधीत सुधारणाविषयक अनेक कामे केली.

१९५०:  पुसद हरिजन मोफत वसतिगृहाचे व दिग्रस राष्‍ट्रीय मोफत छात्रालयाचे अध्‍यक्ष.

१९५१:  विदर्भ प्रदेश कॉंग्रेस समितीचे व कार्यकारिणीचे सदस्‍य.

१९५२:  पहिल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत मध्‍यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल खात्‍याचे उपमंत्री म्‍हणून नियुक्‍ती. ह्याच काळात मध्‍यप्रदेश गृहनिर्माण मंडळाचे अध्‍यक्षपद भूषविले, मध्‍यप्रदेश भू-सुधार समितीचे उपाध्‍यक्ष व मध्‍यप्रदेश सरकारच्‍या मेट्रिक समितीचे अध्‍यक्ष होते.

१९५६:  राज्‍य पुनर्रचनेनंतर जुन्‍या मुंबई राज्‍यात सहकार, कृषी, दुगधव्‍यवसाय या खात्‍यांचे मंत्री म्‍हणून नियुक्‍ती, अखिल भारतीय कॉंग्रेसचे तसेच महाराष्‍ट्र विभागीय कॉंग्रेस समितीचे व तिच्‍या कार्यकारिणीचे तेव्‍हापासून सदस्‍य.

१९५७:  सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेत पुसद मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवड झाली. महाराष्‍ट्र मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्‍हणून नियुक्‍ती, इंडिया कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्‍चरल फायनान्‍स सोसायटीचे सभासद म्‍हणून निवड.

१९५८:  जपानला गेलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय राईस कमिशनच्‍या भारतीय शिष्‍टमंडळात समावेश व जपानला भेट, टो‍कीयो येथे एफ.ए.ओ.च्‍या बैठकांना हजर.

१९५९:  पुसद येथे ‘फुलसिंग नाईक कॉलेज’ ची स्‍थापना. चिनी सरकारच्‍या शेतकी संघटनेच्‍या निमंत्रणावरुन चीनला भेट.

१९६०:  महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेनंतर राज्‍याच्‍या प‍हिल्‍या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्‍हणून नियुक्‍ती. ह्या वेळी शासनाने महत्‍वपूर्ण असा कमाल जमीन धारणा क्षेत्रासंबंधीचा कायदा संमत केला, आपल्‍या मंत्रीपदाच्‍या कारकीर्दित त्‍यांनी लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्‍यक्ष म्‍हणूनही काम केले व महाराष्‍ट्रात पंचायती राज्‍याची मुहूर्तमेढ रोवली.

१९६२:  सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्‍ट्र विधानसभेवर यवतमाळ जिल्‍हातील पुसद मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवड होऊन पुन्‍हा महसूल मंत्री म्‍हणून नियुक्‍ती आणि मुख्‍यमंत्री होईपर्यत हेच खाते त्‍यांच्‍याकडे राहिले.

५ डिसेंबर १९६३:  महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री झाले.

१९६४:  युगोस्‍लाव्हियाचा दौरा.

१९६५:  १ मे १९६५ रोजी आंतर भारती, मुंबई (इंडियन अॅकॅडमी ऑफ लेटर्स) संस्‍थेचे उद्घाटन, भारत-पाक संघर्ष सुरु होताच ९ ते ११ सप्‍टेंबरला मुंबईत स्‍फूर्तिदायक व मार्गदर्शक भाषणे दिली. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात चैतन्‍यदायी वातावरण निर्माण झाले. नंतर काही महिने युध्‍दसज्‍जतेसाठी महाराष्‍ट्राचा दौरा केला, शेती उत्‍पादनाच्‍या नव्‍या कार्यक्रमाचा प्रचार करण्‍यासाठी महाराष्‍ट्रातील २५ जिल्ह्यांचा दौरा.

१९६६:  अवर्षणामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हिंमत देण्‍यासाठी राज्‍यातील दुष्‍काळी जिल्ह्यांत झंझावती दौरा.

१९६७:  सार्वत्रिक निवडणुकीच्‍या प्रभावी प्रचारासाठी महाराष्‍ट्रात दौरा. या निवडणुकीत महाराष्‍ट्र विधानसभेवर पुसद मतदारसंघातून चौथ्‍यांदा निवड होऊन ६ मार्च १९६७ ला महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्री पदावर दुसऱ्यांदा एकमताने निवड, महाराष्‍ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाबाबत महाराष्‍ट्र विधानसभेत भाषण (१७-११-१९६७)

१९७०:  अमेरिकी शासनाच्‍या निमंत्रणावरुन अमेरिकेचा दौरा व युरोपिय देशांना भेटी.

१९७२:  सार्वत्रिक निवडणुकीच्‍या प्रचारासाठी महाराष्‍ट्रात दौरा. या सार्वत्रिक निवडणुकीतून पुसद मतदारसंघातून पाचव्‍यांदा निवड होऊन १४ मार्च १९७२ ला महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्रीपदी तिसऱ्यांदा निवड झाली, महाराष्‍ट्रात गंभीर स्‍वरुपाचा दुष्‍कह पडला होता. राज्‍यातील नऊ जिल्ह्यांतील दुष्‍काळ हा देशातील इतर कोणत्‍याही भागातील दुष्‍काळापेक्षा अधिक तीव्र स्‍वरुपाचा होता; प्रत्‍येक जिल्ह्यात फिरुन त्‍यांनी दुष्‍काळी कामाला जोराने चालना दिली.

२० फेब्रु १९७५:  महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्री पदाचा राजीनामा.

१२ मार्च १९७७:  वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्‍हणून निवड

१८ ऑगस्‍ट १९७९:  सिंगापुर येथे ६६ व्‍या वर्षी निधन

संदर्भमहानायक ग्रंथ संपादन : मधुकर भावेसामान्‍यांतील असामान्‍य- वसंतराव नाईक : लेखक पंढरीनाथ पाटीलसाभार: जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ब्लॉग 

टॅग्स :शेतकरीशेतीमुख्यमंत्रीमहाराष्ट्रवसंतराव नाईकवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी