Join us

चतुरंग शेतीची संकल्पना कृतीत आणण्याची गरज

By मुक्ता सरदेशमुख | Updated: September 4, 2023 20:33 IST

रस्त्यावरील आंदोलने करून शेतीचे प्रश्न सुटणार नसून शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने उद्योजक होण्याची गरज आहे. यासाठी 'सह्याद्री फार्म्स'तर्फे मोहाडी येथे ...

रस्त्यावरील आंदोलने करून शेतीचे प्रश्न सुटणार नसून शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने उद्योजक होण्याची गरज आहे. यासाठी 'सह्याद्री फार्म्स'तर्फे मोहाडी येथे शुक्रवार ते शनिवार असे दोन दिवसीय 'चतुरंग शेती' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी रामचंद्र बापू पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेला सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष ललित बहाळे तसेच इतर जेष्ठ नेते उपस्थित होते. 

शरद जोशी यांच्या संकल्पनेतील सीता शेती, माजघर शेती, व्यापारी शेती, निर्यात शेती या चार बाबींचा समावेश असणारी चतुरंग शेती ही काळाची गरज आहे. तीस वर्षांपूर्वी जोशी यांनी काळाच्या पुढचा विचार मांडला होता. दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष होत गेले. आता हाच विचार आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. यावेळी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन तरुणांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे वक्तव्य विलास शिंदे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना केले.  

चतुरंग शेतीची कृती हेच व्हावे नवे आंदोलन

शेतकरी संघटनेच्या नव्या कार्यक्रमाचे चतुरंग शेती हेच मुख्य सूत्र राहणार आहे. हीच दिशा ठेवून नवे आंदोलन उभारले जाईल, असे ललित बहाळे म्हणाले. यावेळी भारत विरुद्ध इंडिया ही संकल्पना मांडताना शरद जोशी यांनी भारताला सक्षम करण्याचे पर्याय दिले. आता भारताने इंडियावरच नव्हे तर जगावर ही राज्य केले पाहिजे असे शेतकरी संघटनेच्या चेतना सिन्हा म्हणाल्या.

तंत्रज्ञानाने बदलले जग

नव्या तंत्रज्ञानाने जग बदलले आहे. हे नीट समजून घेऊन आपण आता काळानुरूप बदलणे आवश्यक आहे. पारंपारिक पद्धतीत अडकून न पडता स्वतःची वेगळी वाट चोखाळा. मार्केट हे मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालते हे लक्षात ठेवा असे दिनेश शर्मा व श्रीकृष्ण गांगुर्डे यांनी प्रतिपादन केले.

सह्याद्री फार्म्सच्या एच स्क्वेअर इंक्युबॅशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजे भोसले यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले. यावेळी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्यभरातील 250 कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :नाशिकशेतकरीशेती क्षेत्रशेती