Join us

परदेशात द्राक्ष निर्यातीचे स्वप्न अवकाळी पावसामुळे भंगले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:48 AM

तीन एकरांतील द्राक्ष बागेवर चालवावी लागणार कुऱ्हाड

चार दिवसांपूर्वी वादळी वारे, अवकाळी पावसाचा फटका बसून तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील दगडू चुंगे यांची तीन एकर द्राक्ष बाग लोखंडी तारा तुटून जमिनीवर कोसळली. त्यामुळे बागेतील झाडाला लगडलेली ४५ टन द्राक्षे जागेवर सुकून जात असून, ही बाग कुऱ्हाडीने तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे यंदा परदेशात द्राक्ष निर्यातीचे त्यांचे स्वप्न भंगले आहे.

तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) शिवारात दगडू धर्मा चुंगे यांची पाच एकर जमीन आहे. त्यांनी तामलवाडी येथील महाराष्ट्र बँकेचे १६ लाख रुपये कर्ज घेऊन तीन एकर क्षेत्रावर 'माणीकचमन' जातीच्या द्राक्षांची लागवड केली. योग्य जोपासना करून द्राक्ष वेलीला फळधारणा होऊ लागली. दरम्यान, कोरोना काळात सलग तीन वर्ष संकट उभे राहिले. त्यातून कसेबसे सावरून नव्या उमेदीने त्यांनी द्राक्ष बागेतून उत्पादन घेण्याचा प्रयत्न सुरू केला असताना गतवर्षी वादळी वारे अन् अवकाळी पावसात तीन एकर द्राक्ष बाग कोसळून २५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

यंदाही ऑक्टोबर छाटणीपासून १० लाख रुपये खर्च करून त्यांनी बाग फुलवली. एकरी १५ टन द्राक्षाचे उत्पादन पदरात पडून उत्पादित द्राक्षे युरोपात निर्यात करण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले होते. पढील १५ दिवसांत दाक्ष कापणी होणार असल्याने फवारण्या सुरू होत्या. मात्र, अचानक चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात दगडू चुंगे यांची द्राक्ष बाग भुईसपाट झाली. यात ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. त्याचा अहवाल महसूल विभागाकडे सादर केला आहे.

दरम्यान, जमिनीवर कोसळलेली झाडे मध्येच पिचकली आहेत. लोखंडी अँगलही वाकले आहेत. तारा तुटून पडल्या आहेत. यामुळे झाडाला लगडलेली अपरिपक्व ४५ टन द्राक्षे जाग्यावर सुकू लागली आहेत. त्यामुळे तीन एकर द्राक्ष बाग कुन्हाडीने तोडून टाकण्याची वेळ चुंगे यांच्यावर आली आहे.

टॅग्स :द्राक्षेपाऊसहवामानशेती