Join us

कृषिपूरक उद्योगांची गाडी धावेना; विविध पर्यायही यशस्वी होईना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 14:09 IST

फळबागांपासून तर दालमिलच्या उद्योगांना लागला ब्रेक

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात कृषिपूरक उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी क्लस्टर निर्माण करण्यात आले. या माध्यमातून कृषिपूरक उद्योग निर्माण करून: शेतकरी समृद्ध बनावा, यासाठी शेततळे, फळबाग, दालमिल, कांदाचाळ, तेलघाणा असे अनेक प्रयत्न झालेत.

मात्र, या सर्व उद्योगांना पुरेशी चालना मिळत नसल्याने ब्रेक लागला आहे. हे उद्योग सुरू व्हावेत, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असला तरीही शेतकऱ्यांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही. शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून मारेगाव तालुका ओळखला जातो.

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात आल्या. मारेगाव तालुक्यात आठ सिंचन तलावांसह १५ पाझर तलावांची निर्मिती केली गेली. मात्र, नियोजनाअभावी आज या धारणातून केवळ एक ते दोन टक्के सिंचन होत आहे. गेल्या काही वर्षांत विविध शेतीपूरक उद्योग सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून प्रोत्साहन देण्यात येत आहे.

वर्ष २०२२- २३ मध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत १८ लाभार्थ्यांना तेलघाणा, आटा उद्योग, तूर उद्योग, मसाला उद्योग यांसाठी ३५ टक्के अनुदानावर यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, विविध कारणांनी आज हे व्यवसाय डबघाईस आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हीच अवस्था संत्रा, पपई, लिंबू, मोसंबी, डाळिंब आणि भाजीपाला पिकांची झाली आहे. शेतकऱ्यांनी कृषिपूरक उद्योग म्हणून फळपिके आणि भाजीपाला पिके घेण्याकडे कल वाढविला. कृषी विभागाने तसे क्लस्टर तयार केले, पाण्यासाठी शेततळे, धरणांची निर्मिती केली. मात्र, बाजारपेठेअभावी या व्यवसायाची वाट लागली आहे.

प्रक्रिया उद्योगात तालुका माघारला

तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहे. मात्र, या व्यवसायाला गती देण्यासाठी आवश्यक असलेले प्रक्रिया उद्योग तालुक्यात नसल्याने या छोट्या व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुधाळ जनावरे आहेत. मात्र, उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना अल्प दरात दुधाची विक्री करावी लागत आहे. हीच अवस्था फळपिके, मिरची, टोमॅटो, कांदा, लसूण आदी पिकांची झाली आहे. त्यामुळे तालुक्यात प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे.

तालुक्यात क्लस्टर उद्योगांना गती मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात हे उद्योग सुरू होणार आहेत. या उद्योगांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. भविष्यात हे उद्योग सौरऊर्जेवर उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्याला मदत होईल. - सुनील निकाळजे, तालुका कृषी अधिकारी, मारेगाव

हेही वाचा - शेतकरी बांधवांनो भूक मंदावली, थकवा जाणवतोय; किडनीचा आजार तर जडला नाही ना?

टॅग्स :शेती क्षेत्रयवतमाळशेतीशेतकरी