Join us

राज्यात दुष्काळ असूनही उन्हाळी हंगामात ज्वारीचे क्षेत्र वाढले तब्बल ४ पटीने! कुठे किती झाली पेरणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 19:05 IST

यंदा उन्हाळ ज्वारीची लागवडी कमालीची वाढली असून मागच्या वर्षीच्या सरासरीपेक्षा चौपट क्षेत्र वाढले आहे. 

पुणे : यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असून सगळीकडे पाणीटंचाई भासत आहे. नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई असून दुष्काळी पट्ट्यातील पिकांना पाणी नसल्यामुळे पिके वाळून चालल्याची स्थिती आहे. पण दुसरीकडे यंदा उन्हाळ ज्वारीची लागवड कमालीची वाढली असून मागच्या वर्षीच्या सरासरीपेक्षा चौपट क्षेत्र वाढले आहे. 

दरम्यान, राज्याच्या कृषी विभागाकडून १५ एप्रिलअखेरचा उन्हाळी हंगामातील पीक पेरणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये यंदा राज्यातील उन्हाळी हंगामातील एकूण पेरणी ही मागच्या पाच वर्षींच्या तुलनेत ११० टक्क्यांनी तर मागच्या वर्षीच्या तुलनेत ३९२ टक्क्यांनी वाढली आहे. 

यंदाच्या हंगामातील म्हणजेच सन २०२३-२४ मधील उन्हाळी ज्वारीची लागवड ही २९ हजार ४४८ हेक्टरवर झाली असून हीच लागवड मागच्या वर्षी केवळ ७ हजार ५२१ हेक्टरवर होती. उन्हाळ ज्वारीचा मागच्या पाच वर्षातील सरासरी ही १२ हजार ५२३ हेक्टर एवढी होती. तर मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदाची पेरणी ही २३५ टक्के तर मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३९२ टक्के एवढी झाली आहे. 

रब्बी हंगामात किती झाली ज्वारीची पेरणी?रब्बी हंगामात यंदा ज्वारीची पेरणी सरासरीपेक्षा कमी झाली होती. यावर्षी १७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर क्षेत्र ज्वारीच्या पेरणीसाठी संरक्षित ठेवले होते.  त्यातील १६ लाख १७ हजार ९९२ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती.

का वाढले उन्हाळ ज्वारीचे क्षेत्र?यंदा दुष्काळी स्थिती असून सगळीकडे पाणीटंचाईचे सावट आहे. तर चाराटंचाई हे सर्वांत मोठे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चाऱ्याची सोय करण्यासाठी ज्वारीची लागवड केली आहे. त्याचबरोबर ज्वारीला जास्त पाण्याची गरज नसल्याने शेतकऱ्यांनी ज्वारीला पसंती दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी संपशेतकरी