Join us

ऊसतोड कामगारांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामाला दिला हटके निरोप; तुम्हाला पण वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 10:21 AM

फलटण तालुक्यातील जवळजवळ सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. चारदोन दिवसांत उरले सुरले कामगार परतीच्या मार्गावर निघतील.

फलटण तालुक्यातील जवळजवळ सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. चारदोन दिवसांत उरले सुरले कामगार परतीच्या मार्गावर निघतील. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी घर, गाव, शेती, गुरेढोरे सोडून ऊसतोडणीसाठी आलेल्या कामगारांना आता गावी जाण्याचे वेध लागले आहेत.

पिंपरद येथील या हंगामातील शेवटची खेप ट्रॅक्टरमध्ये भरल्यावर ऊसतोड कामगारांनी गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत गुलालाची उधळण केली. सहा महिने काबाडकष्ट केल्यावर मोठ्या आनंदाने गळीत हंगामाची सांगता या ऊसतोड कामगारांनी केली.

गावी जाऊन घर बांधणी, विहीर, खोदणे, मुलीचं लग्न, शिक्षण यासाठी पैसे खर्च करणार असल्याचे सांगत अर्धी रक्कम तर कर्ज फेडण्यात जाईल असेही सांगताना ऊसतोड कामगार भावनिक झाले होते. वर्षानुवर्षे आम्ही या भागात ऊस तोडायला येतो.

आता अनेक बागायतदारांच्या ओळखीसुद्धा झाल्या आहेत. आम्ही गावी गेलो तरी फोनवर ते आमची चौकशी करतात. इकडून पाय निघत नाही हो, असे म्हणत ऊसतोड कामगाराच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

या वर्षीचा गळीत हंगाम शांततेत पार पडला. कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे आम्ही खूश आहोत. आज शेवटची खेप भरली आहे. उद्या गावी निघतोय म्हणून गुलालाची उधळण करणारा ऊसतोड कामगार नृत्यात सामील झाला आहे.

सातारा जिल्ह्यात आल्यानंतर या भागातील उरलेली कामे उरकून ऊसतोड मजूर आता आपापल्या गावाकडे जाणार आहेत. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू झाली आहे.

फुग्यांची सजावट• साखरवाडी कारखान्यावर शेवटची खेप घेऊन चाललेल्या एका ट्रॅक्टरला तर फुग्यांनी सजवला होता.• ऊसाचं कांडकं नी कांडकं गुलालांनी माखलं होत. कष्टाला पण आनंद असतो हे पहिल्यांदा पाहायला मिळाले.

टॅग्स :ऊससाखर कारखानेफलटणशेतकरीकामगार