Join us

Sugarcane Harvesting Machine : शेतकऱ्यांनो ऊस तोडणीची करु नका चिंता; यंत्र आहे मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:08 IST

ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांच्या मदतीला यंत्र आले आहेत. (Sugarcane Harvesting Machine)

Sugarcane Harvesting Machine :रामेश्वर काकडे

नांदेड : दरवर्षी शेतकऱ्यांचा ऊस तोडणीसाठी येऊनही मजुरांची कमतरता असल्याने अनेक महिने शेतात पडून राहतो. यामध्ये शेतक-यांच्या उसाचे वजन घटून नासाडीचे प्रमाण वाढून नुकसान होते. परंतु, आता ऊस उत्पादकांना काळजी करण्याचे कारण नाही, या हंगामात नांदेड विभागात ऊस तोडणीसाठी तब्बल २७८ तोडणी यंत्र दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात आर्थिक बचत होऊन नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.

नांदेड विभागात यावर्षी दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आल्याची नोंदणी कारखान्यांकडे करण्यात आली आहे. तर चार जिल्ह्यात आतापर्यंत २१ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले असून कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे.

आतापर्यंत ४ लाख ७० हजार मेट्रिक टन उसाचे गाळपट्टी करण्यात आले आहे. पण, दरवर्षीपेक्षा लागवडी क्षेत्र जवळपास १७ टक्क्यांनी घटल्याने साखरेच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांचा ऊस तोडणीला येऊनही वेळेवर कापणी होत नसल्याने अनेक महिने ऊस शेतातच पडून राहतो. अनेकदा हिंस्त्र प्राण्याकडून उसाची नासाडी होते. तसेच वजनातही घट होते. त्यामुळे उताराही कमी येतो. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागतो.

शेतकऱ्यांच्या मदतीला आता यंत्र

या सर्वावर उपाय योजना म्हणून आता शासनाने नांदेड विभागातील शेतकऱ्यांसाठी ऊस तोडणी यंत्र उपलब्ध करुन दिले आहे. या हंगामापासून प्रादेशिक विभागातील नांदेड जिल्ह्यात ४ कारखान्यासाठी ३८ ऊस तोडणी यंत्र उपलब्ध झाले आहेत. तर परभणी जिल्ह्यासाठी ५०, हिंगोली जिल्ह्यासाठी १३ तर लातूर जिल्ह्यासाठी सर्वाधिक १७७ ऊस तोडणी यंत्राद्वारे उसाची तोडणी करण्यात येत आहे.

एका दिवसात होते १२० ते १८० मेट्रिक टन उसाची तोडणी

एका यंत्राद्वारे एका दिवसात १२० ते १८० मेट्रिक टन उसाची तोडणी करण्यात येते. त्यामुळे एवठ्या मोठ्या प्रमाणात यंत्र उपलब्ध आल्याने ऊस तोडणी वेगाने होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे आता जास्त दिवस शेतकऱ्याचा ऊस शेतात पडून राहणार नाही.

मागील काही वर्षांपासून टोळ्यांची कमतरता असल्याने तोडणीसाठी विलंब होत आहे. पण यांत्रिकीकरणामुळे यावर्षी लातूर जिल्ह्यात ८० टक्के ऊस, तोडणी यंत्राद्वारे तोडला जात आहे. याशिवाय नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही तोडणी यंत्र उपलब्ध झाल्याने शेतकऱ्याच्या खर्चात बचत होणार असून नुकसानीलाही लगाम बसणार आहे. -विश्वास देशमुख, सहसंचालक (साखर)

टॅग्स :शेती क्षेत्रऊसतंत्रज्ञानशेतकरीशेती