Join us

Sugar Market : साखरेमध्ये मागणीपेक्षा पुरवठा अधिक; कारखाने कसं जुळवणार साखरेचं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:05 IST

साखरेच्या उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेऊन साखरेचे दर वाढविले नाही तर संपूर्ण साखर कारखानदारी भविष्यात अडचणीत येईल, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. (दादा) पाटील यांनी बुधवारी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

कोल्हापूर : साखरेच्या उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेऊन साखरेचे दर वाढविले नाही तर संपूर्ण साखर कारखानदारी भविष्यात अडचणीत येईल, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. (दादा) पाटील यांनी बुधवारी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

सरकार याविषयी गंभीर नाही, त्यामुळे या उद्योगाला दिलासा देणारे निर्णय नजीकच्या काळात होतील, असेही वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. चालू वर्षी सर्वत्र पुरेसा आणि सातत्याने पाऊस झाल्याने ऊस पिक उत्तम आले आहे.

देशभरात ४७२ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. महाराष्ट्रात १०४ सहकारी आणि १०३ खासगी साखर कारखाने आहेत. त्यातील १८३ कारखान्यांनी गळीत हंगाम चालू केला आहे.

आत्तापर्यंत महाराष्ट्रात १६ लाख ८० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे, असे स्पष्ट करीत पाटील म्हणाले, साखर कारखान्यांना एक टन ऊस गाळप करण्यासाठी सुमारे ३७०० रुपये खर्च येतो. साखरेची आधारभूत किंमत वाढविली तरच हा खर्च परवडणारा आहे.

देशभरात ३३० लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. शिवाय गेल्या वर्षीचा शिल्लक साठा ८० लाख टन आहे. याचाच अर्थ २०२४-२५ या वर्षात ४१० लाख टन साखर असणार आहे. सरकारने आजवर केवळ २० लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

देशांर्तगत साखरेची मागणी २९० लाख असते. ३१० लाख टन उठाव झाला तरी १०० लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्याने निर्यातीचा कोटा वाढविणे आवश्यक आहे, अशी मागणी राज्य साखर संघाची आहे, असे पाटील म्हणाले.

इथेनॉलच्या उत्पादन आणि वितरणाविषयी देखील दीर्घकालीन धोरण नसल्याने अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. असे सांगून एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, महाराष्ट्रात १२५ लाख साखरेचे उत्पादन होणार असताना केवळ १२ लाख टन उसापासून इथेनॉल बनविण्यास परवानगी दिली आहे.

साखरेचे भाव वाढत नसल्याने इथेनॉल उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेण्यात येत असला तरी केंद्र सरकारने गेल्यावर्षी अचानक इथेनॉल उत्पादनावर बंदी घातली. परिणामी ज्या साखर कारखान्यांनी साखरेऐवजी पूर्ण इथेनॉल उत्पादन करण्याचा निर्णय घेऊन प्रकल्प उभारले होते. ते आता अडचणीत सापडले आहेत.

उसाची दरवाढ कायमकेंद्र सरकार उसाच्या आधारभूत किमतीत दर वर्षी वाढ करीत आहे, हे स्वागतार्ह आहे. कारण उसाचा उत्पादनखर्च वाढतो आहे. पण साखरेचे दर वाढविणेही आवश्यक आहे, अन्यथा उसाला दर देताना साखर कारखाने अडचणीत येतील. पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होईल.

५४ वर्षे संचालकपी. आर. पाटील म्हणाले, मी १९६८ पासून सलग ५४ वर्षे राजारामबापू पाटील यांनी उभारलेल्या साखर कारखान्याचा संचालक होतो. त्यापैकी २८ वर्षे कारखान्याचा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. आता साखर उद्योग नेहमीच संकटाशी सामना करीत असतो.

केंद्रीय मंत्र्यांची भेट• केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन साखरेचे दर वाढविण्याची विनंती केली.• त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी हवामानातील चढउतार पाहता तातडीने निर्णय होईल असे वाटत नाही.

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतीराज्य सरकारकेंद्र सरकारसरकार