Join us

Sugar Factory : मांजरा साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात; सौर ऊर्जा प्रकल्पास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 12:28 IST

मांजरा साखर कारखान्याचा ३८ वा गळीत हंगामास सुरुवात झाली आहे. (Sugar Factory)

Sugar Factory :

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ३८ वा गळीत हंगाम व नव्याने उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रारंभ माजी मंत्री चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाला.

यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार, जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, संत मारुती महाराज कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, उपाध्यक्ष सचिन पाटील, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, कार्यकारी संचालक पंडित देसाई आदी उपस्थित होते.

याप्रसंगी कारखान्याने घेतलेल्या दोन हार्वेस्टरचे पूजन करण्यात आले. मागील हंगामात जवळपास ९७ टक्के ऊसतोड हार्वेस्टरद्वारे करून देशभरात मांजरा पॅटर्न निर्माण केला. त्याबाबत मांजरा पॅटर्नचे कौतुक होत आहे. कारखान्याकडे पाच हार्वेस्टर असून त्यात आणखीन दोन हार्वेस्टरची भर पडली आहे. तत्पूर्वी कारखान्याचे संचालक कैलास पाटील यांच्या हस्ते सपत्नीक श्री मांजरेश्वर हनुमानास अभिषेक, गव्हाण पूजन व सत्यनारायण पूजन झाले.

आ. धीरज देशमुख म्हणाले, सहकारी संस्थांमधील मांजरा कारखाना हा आदर्शवत असून नवनवीन प्रकल्प उभारताना मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या आर्थिक नियोजनातून स्वच्छ व पारदर्शक कारभार सुरु आहे.

भविष्यात आपला शेतकरी केवळ साखर उत्पादक न राहता तो इंधन निर्मिती करणारा, अशी ओळख आपणास निर्माण करावयाची आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मांजरा साखर परिवारातील संस्थांचे कार्यकारी संचालक, रेणा, विलास, जागृती कारखाना, जिल्हा बँक, बाजार समितीचे संचालक मंडळ, शेतकरी, सभासद खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उसाला सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न

• माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख म्हणाले, मांजरा साखर कारखान्याने अतिशय सूक्ष्म नियोजन व पारदर्शकता ठेवून काम करीत भविष्याचा वेध घेत वेगवेगळे प्रकल्प कार्यान्वित केले. त्यातून शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न असून पश्चिम महाराष्ट्रात गेटकेन उसाला कमी भाव मिळतो. मात्र आपला मांजरा परिवार सर्वांना एकच भाव देण्याचा निर्णय लोकनेते विलासराव देशमुख यांनी घेतलेला तीच परंपरा आजही सुरू आहे.

• डिस्टिलरीची क्षमता वाढविलेली असून शेतकरी सभासदांचा जो विश्वास परिवाराने संपादन केला आहे, त्याची जपणूक करत सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न परिवाराने केला आहे. ती परंपरा पुढेही सुरु राहील.

• मांजरा परिवाराने काळाची गरज ओळखून नेहमीच विविध प्रकल्प कार्यान्वित केले. शेतकरी सभासदांचा कारखान्यावरील विश्वास कायम ठेवण्याचे काम केले व यापुढेही केले जाईल. शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी केले.

टॅग्स :शेती क्षेत्रसाखर कारखानेलातूरशेतकरीशेती