Join us

ST Mahamandal : एसटीच्या महाव्यवस्थापकांचे निर्देश ; 'हे' नऊ ओळखपत्र चालणार आता एसटी प्रवासात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:20 IST

'आधार' व्यतिरिक्त अन्य ओळखपत्रे ग्राह्य धरून ज्येष्ठांना तिकिटात सवलत देण्याचे आदेश एसटीच्या महाव्यवस्थापकांनी काढले आहेत. कोणते आहेत कागदपत्र ते वाचा सविस्तर (ST Mahamandal)

ST Mahamandal : 'आधार' व्यतिरिक्त अन्य ओळखपत्रे ग्राह्य धरून ज्येष्ठांना तिकिटात सवलत देण्याचे आदेश एसटीच्या महाव्यवस्थापकांनी काढले आहेत. त्यामुळे आजोबा आता कंडक्टरशी नाही भांडायचे, आधार नसेल तर महामंडळाच्या सूचनेनुसार ग्राह्य धरता येणारे अन्य ओळखपत्र दाखवणे होणार सोयीचे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी वयानुसार ज्येष्ठ नागरिकांना सवलती आहेत. या सवलतीच्या आधारे प्रवास करताना जन्मतारीख, वया पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाते; परंतु घाईगडबडीत प्रवासाला निघालेल्या अनेकांकडे नेमके आधारकार्ड नसते. त्यामुळे इतर प्रमाणित ओळखपत्र ते दाखवतात; परंतु अशी ओळखपत्रे वाहक नाकारत असल्याने वादाचे प्रसंग उद्भवतात.

यासंदर्भात महामंडळाकडे तक्रारी आल्यानंतर आधारशिवाय इतर कोणते ओळखपत्र ग्राह्य धरावे, याबाबत 'रापम'च्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापकांनी ४ डिसेंबर रोजी आदेश जारी केले आहेत. यामुळे आता बसमध्ये वाहक आणि प्रवास करणाऱ्या आजोबांचे तंटे संपुष्टात येणार आहेत.

६५ ते ७५ वयोगटासाठी ५० टक्के सवलत

६५ ते ७५ वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये ५० टक्के प्रवास सवलत देण्यात येते.

७५ पेक्षा जास्त वय असल्यास प्रवास मोफत

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या ७५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत आहे.

वय पडताळणीसाठी 'आधार' गरजेचे

प्रवास करणाऱ्या सवलतधारी प्रवाशाचे वय पडताळणीसाठी आधारकार्ड गरजेचे असते. शासनाच्या सर्वच योजनांमध्ये आधारकार्ड आता महत्त्वाचे आहे.

आधार नसल्यास कंडक्टरशी भांडू नका आजोबा

सवलतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ओळखपत्र म्हणून आधारकार्ड पुरेसे असते; परंतु अनेकदा अशा प्रवाशांकडे आधारकार्ड नसते. इतर कार्ड दाखविल्यास वाहक त्यास नकार देतात. आधार नसल्यास वय, ओळखीचा पुरावा असलेले इतर कार्ड चालते म्हणून वाहक आणि प्रवासी आजोबांचे खटके उडतात.

महाव्यवस्थापकांचे आदेश काय?

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी सवलतधारी प्रवाशांच्या बाबतीत सूचना दिलेल्या आहे. याबाबत २५ ऑगस्ट २०२२ तसेच ३१ जानेवारी २०२३ रोजी पत्र जारी केलेले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा ४ डिसेंबर २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिक सवलतीकरिता कोणकोणते ओळखपत्रे ग्राह्य धरण्याबाबत सर्व विभाग नियंत्रक व आगारप्रमुखांना कळविले आहे.

'आधार' नसल्यास ही कागदपत्रे चालणार

महाव्यवस्थापकांच्या आदेशानुसार ज्येष्ठ नागरिकांना 'रापम'च्या बस प्रवास भाड्यात सवलतीसाठी आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, तसेच केंद्र किंवा राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र ज्यात फोटो, जन्मतारीख, रहिवासी पत्ता नमूद असणे आवश्यक आहे. याशिवाय पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, तहसीलदारांनी दिलेले ओळखपत्र.

एसटीची स्मार्ट कार्ड सुविधाही उपयुक्त

राज्य परिवहन महामंडळाने दिलेले स्मार्टकार्ड देखील ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

'डिजीलॉकर'ही वापरता येणार

संगणक युगात आता 'डिजिलॉकर'मध्ये अनेकजण त्यांच्याजवळील महत्त्वाच्या कागदपत्रांची साठवणूक करतात. असे डिजिलॉकर, एम-आधार सवलतधारी प्रवाशांना वापरता येणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रसरकारी योजनासरकारशेतकरीशेतीआधार कार्ड