Join us

Soybean Market : भाव नाही दिला तरी घरातच थप्पी लावू ; वेळप्रसंगी आंदोलनाची तयारीही ठेवू, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 18:49 IST

सरकारने सोयाबीनची खरेदी सरसकट करावी, अन्यथा शेतकरी आंदोलन करणार काय आहे प्रकरण वाचा सविस्तर (Soybean Market)

Soybean Market :

वसमत :

राज्य सरकार सोयाबीनची खरेदी आधारभूत किमतीने करणार आहे. मात्र, ती फक्त २० दिवस असणार, अशी घोषणा करण्यात आली. पण सोयाबीनचे उत्पादन निघाल्यावर त्यात ओलाव्याचे प्रमाण अधिक असते, ते जर १० टक्क्यांच्या वर असेल, तर सोयाबीनची खरेदी शासनाकडून केली जाणार नाही.

त्यामुळे सरकारने सोयाबीनची खरेदी सरसकट करावी, अन्यथा शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावर्षी सोयाबीनवर खोडकिडा, खोडमाशी किंवा येलो मोझॅकसारख्या रोगाला सोयाबीन बळी पडले आहे. फवारणी करूनही अळीचा नायनाट होत नाही.

त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यात सोयाबिनला हमी भाव देखील मिळाला नाही तर आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे शेतकरी आतापासूनच आक्रमक झाला आहे.

शेती क्षेत्रापातील हस्तक्षेप थांबवावा

शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल एवढा रास्त भाव मिळू द्यावचा असेल तर आयात, निर्यातीचे धोरण शिथिल करावे. शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या निवडीचे स्वातंत्र्य द्यावे, हे जर येणाऱ्या काळात आले नाही, तर शेतीचे नुकसान होणार आहे. -बालाजीराव काळे, शेतकरी

शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानात आणि वाढत्या तापमानात व कमी अधिक पाण्यात सोयाबीन काढल्यानंतर त्यात ओलाव्याचे प्रमाण जास्त असते. परंतु तसे सोयाबीन नाफेड खरेदी करीत नाही. - श्रीराम इंगोले, शेतकरी

बदलते हवामान आणि वाढते तापमान पिकांना सहन होत नाही. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, चणा, गहू कोणत्याही पिकांची शेती करणे कठीण होणार आहे. - संजय गुळगुळे, शेतकरी

हमीभावासाठी जाचक अटी लावल्या जात आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी व्यापाऱ्यांना सोयाबीन विकून मोकळे होतात. सोयाबीनला ७ हजार रुपये भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना सोयाबीन लावणे परवडते. - बालाजी दळवी, शेतकरी

उत्पादन देणाऱ्या बियाणाच्या संशोधनाची परवानगी शेतकऱ्याला द्यावी. म्हणजे शेतकऱ्याला तंत्रज्ञानाच्या निवडीचे स्वातंत्र्य हवे. बेरोजगारीचे संकट अधिक गडद होत जाईल म्हणून सरकारने ताबडतोब दीर्घकालीन निर्णय घेण्याची क्षमता ठेवावी. - साईनाथ पतंगे, शेतकरी

 शेतकऱ्यांना विनाकारण वेठीस धरू नये

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून थातूरमातूर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. नाही तर शेतकऱ्यांना विनाकारण वेठीस धरू नये.नाही तर शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात आंदोलनाची तयारी करावी लागेल, असा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

नवीन सोयाबीनची आवक सुरु; दर मिळतोय साडेचार हजार रूपये

जवळा बाजार : दोन दिवसांपासून बाजारपेठेत नवीन सोयाबीन येऊ लागले आहे. मात्र सोयाबीनला साडेचार हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जवळपास ५० गावांतील शेतकरी येथील बाजारपेठेत शेतीमाल घेऊन येतात; परंतु सद्यस्थितीत योग्य भाव मिळत नाही. नवीन सोयाबीनला प्रतिक्विंटल साडेचार हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे.

जवळाबाजार व परिसरात सोयाबीनचा पेरा अधिक आहे. परंतु यावर्षी उतारा एकरी चार ते पाच क्विंटल येत आहे. खरीपातील सर्व शेतीमालाला योग्य भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

खर्च निघणेही झाले कठीण

■ नवीन सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० तर जुन्या सोयाबीनला ४ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सोयाबीनची आवक वाढल्यास पुन्हा दर कमी होतील का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

■ सोयाबीनचा उतारा कमी येत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनशेतकरीशेतीशेतकरी आंदोलन