पारनेर : पारनेर तालुक्यातील १९० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जिल्हा फेडरेशन व पणन महामंडळाकडून १ कोटी १ लाख ९२ हजार रुपये जमा झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे व सचिव सुरेश आढाव यांनी दिली.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या सोयाबीन खरेदी केंद्रात सोयाबीन देऊनही शेकडो शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याबाबत 'लोकमत'ने ११ सप्टेंबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.
या वृत्ताची दखल घेत जिल्हा फेडरेशन व पणन महासंघाने तातडीने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले. पैसे जमा झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
तर दुसरीकडे १५ डिसेंबरपर्यंतच सोयाबीन ऑनलाइन नोंदणीची मुदत ठेवण्यात आली होती; परंतु ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी नगर यांच्यामार्फत पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
परंतु सोयाबीन खरेदीसाठी शासनाने ठेवलेल्या जाचक अटी व पावणे दोन महिन्यांपासून खरेदीचे पैसे थकविल्याने या सोयाबीन खरी केंद्रास शेतकऱ्यांचा अल्पसा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
सोयाबीनला शासकीय आधारभूत किमतीने हंगाम २०२४-२५ करिता ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. सोयाबीन उत्पादकांच्या अडचणींबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पैसेही जमा झाले असून ऑनलाइन नोंदणीची मुदतवाढही मिळाली आहे.
खरेदी व नोंदणीला मुदतवाढ : बाबासाहेब तरटे- शासकीय आधारभूत सोयाबीन खरेदी केंद्रावर ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून १२ जानेवारी २०२५ पर्यंत सोयाबीन खरेदी केली जाणार असल्याचे सभापती बाबासाहेब तरटे व सचिव सुरेश आढाव यांनी सांगितले.- पारनेर केंद्रावर १ हजार ५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून जवळपास यापैकी ७०० शेतकयांना या संबंधीचे एसएमएस मोबाईलवर पाठविण्यात आलेले आहे. त्यापैकी २६१ शेतकऱ्यांनी ३०८६.५ क्चिटल सोयाबीन या केंद्रावर घातले आहेत.- त्यापैकी १९० शेतकऱ्यांच्या २०८३.५ क्विंटलचे १ कोटी १ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असल्याचे तरटे व उपसभापती बापूसाहेब शिर्के यांनी सांगितले.