दीपक अग्रवाल
खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आला असून मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सर्वाधिक पसंती सोयाबीन पिकाला दिली आहे. मागील वर्षांप्रमाणे यंदाही तूर व कापूस अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (soybean crop)
कृषी विभागाने शेती शाळा आणि जनजागृती मोहिमा राबवून शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला दिल्याने उत्पादकतेत वाढ होण्याची शक्यता आहे. मूर्तिजापूर तालुक्यात २०२५-२६ या खरीप हंगामात पुन्हा एकदा सोयाबीन पिकालाच सर्वाधिक पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे. (soybean crop)
तुरीला दुसरे तर कापसाला तिसरे प्राधान्य दिले जात असून, कृषी विभागाने गावोगावी शेती शाळा आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन सुरू केले आहे. (soybean crop)
तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ८०,५३२ हेक्टर असून, त्यापैकी खरीप हंगामासाठी ६८,८८८ हेक्टर क्षेत्र राखीव आहे.
रब्बी हंगामासाठी १८,०५७ हेक्टर आणि उन्हाळी हंगामासाठी केवळ ४८२ हेक्टर क्षेत्र वापरले जाते. खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद आणि ज्वारी ही पिके घेतली जातात.
तालुक्यातील एकूण ४०,९०७ शेतकऱ्यांपैकी ३४,७७० अल्प व अत्यल्प भूधारक असून केवळ ६,१३६ शेतकरी हे बहुभूधारक आहेत.
कृषी विभागाचे मार्गदर्शन
कृषी विभागामार्फत स्थानिक पातळीवर शेती शाळा व इतर जनजागृती कार्यक्रम राबविले जात असून शेतकऱ्यांना योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी, खत व कीड नियंत्रणाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे आगामी हंगामात अधिक उत्पादन मिळवण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
पाच वर्षातील खरीप पिकांचे नियोजन (हेक्टरमध्ये) :
वर्ष | सोयाबीन | तूर | कापूस | मूग | उडीद | भाजीपाला |
---|---|---|---|---|---|---|
२०२१-२२ | ४६,२०२ | १०,८५२ | ६,६९१ | 3,७२१ | १,२५० | - |
२०२२-२३ | ५०,६४७ | १०,६७४ | ७,४२४ | ४०० | २९० | - |
२०२३-२४ | ४९,०३७ | ११,६५० | ७,००० | ५७१ | २५० | २३७.४ |
२०२४-२५ | ४८,०५७ | ११,१५७ | - | २५० | ३०० | ७५०० |
२०२५-२६ | ४८,४०० | ११,१५७ | - | १५० | - | ७,९०० |