Join us

तीळ, मूग, सूर्यफूल पेरा अन् पैशातून मालामाल व्हा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 3:59 PM

खरीप हंगामातील उत्पादित धान्याच्या हमी भावात याही वर्षी वाढ

अरुण बारसकर

मागील तीन-चार वर्षात बाजार समित्यांमध्ये दरात घसरण झाल्याने सोलापूर जिल्ह्यात हमी भाव केंद्रावर मका व हरभऱ्याची खरेदी झाली होती. मात्र, इतर उत्पादनाला हमी भावापेक्षा चांगला दर बाजारात मिळत असल्याने हमी भाव केंद्रे सुरू करावी लागत नाहीत. दरम्यान, खरीप हंगामातील उत्पादित धान्याच्या हमी भावात याही वर्षी चांगलीच वाढ करण्यात आली आहे.

मागील दोन वर्षांत केवळ हरभऱ्याचे बाजारात खरेदी दर हमी भावापोक्षा कमी झाले होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी हमी भाव केंद्र सुरू करण्यात आली होती. दोन वर्षांखाली मका हमी भाव केंद्रावर खरेदी केली होती.

इतर उत्पादनाला बाजारात हमी भावापेक्षा चांगले दर मिळत असल्याने हमी भावाने खरेदी करावी लागली नाही. याही वर्षी हमी भाव केंद्रे सुरू करावी लागत नसल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येक धान्याच्या हमी भावात वाढ करण्यात आली आहे.

तीळ, मूग अन् भुईमूग सर्वच धान्याच्या हमी भावात यंदा वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये तिळाच्या हमी भावात ८०५ रुपये, मूग ८०३ रुपये, तर भुईमुगाचा हमी भाव क्विंटलला ५२७ रुपये वाढ केली आहे.

भावात चांगली वाढ केली, हे समाधानकारक आहे. मात्र, मूग पेरणीवेळी पाऊस पडला नसल्याने पेरणी करता आली नाही व पेरलेल्याची वाढ झाली नसल्याने उत्पादन आले नाही. रब्बीसाठी पुरेसा पाऊस नसल्याने तीळ, भुईमुगाचे पीक घेणे अडचणीचे ठरणार आहे. -शंकर मोरे, शेतकरी वडाळा

सोयाबीनला सहा हजारांपेक्षा अधिक दर गेल्याने सोयाबीन पीक घेतले तर भाव चार हजारांवर आला. यंदा पाऊस नसल्याने सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन आले नसले तरी हमी भावात म्हणावी तितकी वाढ झाली नाही, बाजरी, ज्वारीच्या हमीभावात आणखी वाढ अपेक्षित होती. शासनाने अधिक उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना क्षेत्रानुसार पुरवावे, -पप्पू खतीब, शेतकरी गवळेवाडी

तिळाचे १३ हेक्टर क्षेत्र

सोलापूर जिल्ह्यात गव्हाची ५२५८८ हेक्टर क्षेत्रात पेरणी असली तरी आतापर्यंत ६ हजार ६०० हेक्टर, हरभऱ्याचे क्षेत्र ६० हजार हेक्टर असताना २३ हजार हेक्टरवर, तर तिळाचे १३ हेक्टर असताना १० हेक्टरवर पेरणी झाली.

टॅग्स :खरीपशेतकरीमार्केट यार्ड