Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sorghum : धक्कादायक! मागच्या ६ दशकात खरीप ज्वारीच्या क्षेत्रात तब्बल ९४ टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 00:12 IST

ज्वारीचे क्षेत्र कमालीचे घटले असून यामागे काय कारण असेल?

पुणे : भारत स्वातंत्र झाल्यापासून भारतीय पीक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. त्यातच हरीतक्रांतीमुळे भारतीय कृषी व्यवस्थेमध्ये अभूतपूर्व बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. भारताचे मुख्य पीक असलेल्या भात आणि गव्हाने क्रांती केली आणि उत्पादनही पटीने वाढले. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या ज्वारी, बाजरी, नाचणी अशा तृणधान्य पिकांच्या क्षेत्रामध्ये कमालीची घट झाल्याचे चित्र आहे. 

दरम्यान, स्वातंत्र्योत्तर काळात राज्यात मुख्य खाद्य हे ज्वारी आणि भात हे होते. पूर्व विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीचा घाट येथे भात तर उर्वरित महाराष्ट्रात ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर होते. पण कालांतराने या पिकांचे क्षेत्र कमी झाले. खरीप ज्वारीच्या पीकपद्धतीमध्येच बदल झाला असून राज्यातील एकूण पेऱ्यापैकी मागच्या सहा दशकामध्ये तब्बल ९४ टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे. सध्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, विदर्भातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत खरीप ज्वारीची पेरणी केली जाते.  

भारत स्वातंत्र झाल्याच्या वर्षी म्हणजे १९६० साली खरीप ज्वारीखालील क्षेत्र हे २५ लाख ४९ हजार हेक्टर एवढे होते. तर उत्पादकता ही ८६४ किलो प्रतिहेक्टर एवढी होती. त्यानंतरच्या  चाळीस वर्षामध्ये म्हणजे २००० सालापर्यंत ज्वारीचे क्षेत्र हे २० लाख हेक्टरच्या आसपास राहिले. दरम्यान, १९८३-८४ साली खरीप बाजरीची महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत जास्त पेरणी झाली होती. यावर्षी तब्बल ३१ लाख ८ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली होती.

साधारण २००० सालापासून खरीप ज्वारीचे क्षेत्र झपाट्याने कमी झाले असून तीन वर्षापूर्वी हे क्षेत्र २ लाख ६३ हजार हेक्टरच्या आसपास होते पण २०२२-२३ सालच्या हंगामात खरीप ज्वारीचे क्षेत्र हे केवळ १ लाख ५१ हजार हेक्टरवर येऊन ठेपले आहे. जिरायती शेतकरी कालांतराने नगदी पिकांकडे वळू लागल्याने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, कापूस आणि उसाची लागवड महाराष्ट्रात झाली. 

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात सोयाबीनखालील क्षेत्र हे सर्वाधिक आहे. साधारण १९८४-८५ साली महाराष्ट्राला सोयाबीन या पिकाची ओळख झाली आणि हळूहळू सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पण २००० सालापासून सोयाबीनच्या क्षेत्रात कमालीची वाढ आपल्याला पाहायला मिळेल. 

खरीप ज्वारीचे क्षेत्र कसेकसे घटत गेले?वर्ष - खरीप ज्वारीखालील क्षेत्र 

  • १९६०-६१ = २५ लाख ४९ हजार हेक्टर 
  • १९७०-७१ =  २५ लाख ३७ हजार हेक्टर 
  • १९८०-८१ =  २९ लाख ७१ हजार हेक्टर
  • १९९०-९१ =  २७ लाख ६८ हजार हेक्टर
  • २०००-०१ = १९ लाख १० हजार हेक्टर
  • २०१०-११ =  १० लाख ३१ हजार हेक्टर
  • २०२०-२१ =  ३ लाख ७९ हजार हेक्टर
  • २०२२-२३ = १ लाख ५१ हजार हेक्टर
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी