छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे.
योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडळात गेल्या ४ महिन्यांत ४ सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी २ प्रकल्पांचा यात समावेश आहे.
या योजनेतील राज्यातील ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प (Solar Power Project) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धोंदलगाव (ता. वैजापूर) येथे ५ सप्टेंबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात झाला.
उपकेंद्रापासून साडेतीन किमी अंतरावरील १३ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेला हा प्रकल्प धोंदलगाव ३३ केव्ही उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे.
उपकेंद्रातून निघणाऱ्या ५ वीज वाहिन्यांवरील १ हजार ७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे.
या योजनेतील जालना जिल्ह्यातील ६ मेगावॅट क्षमतेचा पहिला प्रकल्प हिवर्डी येथे २९ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पातून निर्माण झालेली वीज ३० गावांतील २ हजार ५७० कृषिपंपांना पुरवली जात आहे.
जिल्ह्यातील दुसरा प्रकल्प केळीगव्हाण (ता. बदनापूर) येथे ३१ डिसेंबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात आला. ५ मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पातून ६ गावांतील १ हजार १०० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
६५० शेतकऱ्यांना दिवसा वीज
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ मेगावॅट क्षमतेचा दुसरा प्रकल्प वरखेडी (ता. फुलंब्री) येथे उभारण्यात आला. २ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रकल्पातून आळंद व बोरगावमधील ६५० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे.
मनपा सौरऊर्जेकडे; जिथे जागा मिळेल, तेथे सौर पॅनल
* पाणीपुरवठा, पथदिवे मनपाच्या विविध कार्यालयांमधील विजेचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हा खर्च कमी करण्यासाठी प्रशासनाने सौरऊर्जेकडे वाटचाल सुरू केली. जिथे जागा मिळेल तेथे सौर पॅनल उभारण्यात येत आहेत. पुढील दीड ते दोन वर्षात वीज बिलावर होणारा खर्च पन्नास टक्के तरी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.
* पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला दरमहा दीड कोटी रुपयांचे वीज बिल भरावे लागते. शहरातील पथदिव्यांचे बिलही एक कोटीपर्यंत आहे. याशिवाय सर्व कार्यालयांचे बिलही ५० ते ५५ लाखांपर्यंत जाते. वाढत्या वीज बिलाचा भार मनपासाठी डोकेदुखी ठरत आहे.
* त्यामुळे छोटे-छोटे सौर प्रकल्प उभारण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारले. आज नाही तर उद्या हे धोरण स्वीकारावेच लागणार आहे. त्यामुळे आतापासूनच सुरुवात करण्यात आल्याचे विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी सांगितले.
मनपाच्या शाळांवर सौर पॅनल
* मनपाच्या सर्व शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू केली. यात काही टप्पे ठरविण्यात आले. मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे ८० किलो वॅट प्रकल्पासाठी निविदाही काढण्यात आली.
* सिद्धार्थ उद्यानांसह अन्य ठिकाणीही प्रकल्प राबविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. प्राथमिक स्तरावर २०० पेक्षा अधिक जागांची पाहणी केली.
१०० एकर गायरान जागेचा शोध
शहराच्या आसपास पडीक असलेली खासगी किंवा गायरान १०० एकर जागा मिळविण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या जागेपासून जवळच महावितरणचे सबस्टेशन असले पाहिजे. येथे तयार होणारी वीज सबस्टेशनला दिली जाईल. जेवढी वीज मनपा देईल, तेवढी रक्कम वीज बिलातून कपात केली जाईल.