विकास शिंदेपारंपारिक पिकांबरोबर आता फळबागा, फुलबागांकडेही शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतो आहे. फलटण तालुक्यातील चौधरवाडी येथील सुरेंद्र दत्तात्रय पवार या अल्पभूधारक शेतकऱ्याने मोगऱ्याच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे.
तसेच पाच गुंठे क्षेत्रात मोगऱ्याचा सुगंध फुलवत आपल्या कुटुंबासाठी हमखास उत्पन्न मिळवण्याचे साधनही निर्माण केले आहे. चौधरवाडी येथील सुरेंद्र पवार यांना लहानपणापासूनच शेतीची आवड.
तसेच ते हार बनवण्याचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करत असतानाच त्यांना मोगरा फुलाची शेती करण्याची कल्पना सुचली. यातूनच त्यांनी आपल्या पाच गुंठे क्षेत्रात बारामती येथून आणलेली मोगऱ्याची रोपे लावली.
मागील तीन वर्षांपासून अखंडपणे या प्रयोगातून उपजीविकेचे साधन निर्माण केले आहे. तसेच त्यांच्या शेतात आज १०० झाडे आहेत. त्याचे व्यवस्थित हंगामवार नियोजन केले आहे.
मार्च ते सप्टेंबर या महिन्यासाठी त्यांनी महाराष्ट्रीयन एक पाकळी मोगरा लावला आहे. तर सप्टेंबर ते मार्च यासाठी बेंगलोरचा कांगडा लावला आहे.
कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फुलशेती निश्चितच फायद्याची ठरत आहे. तर कमी क्षेत्र असलेतरी यासाठी कष्ट करावे लागतातच. सुरेंद्र पवार हेही सकाळी लवकर कळ्या तोडण्यास सुरुवात करतात.
शेतीत माती, पाणी हे प्रकारचे गणित आहे. झाडांना काय पाहिजे आणि काय नको याचा आपण अभ्यास करावा. आपण माणूस तसेच जनावरांना समजून घेतो. तसेच झाडांना, शेतीला समजून घेतले तर आपणास कधीच नुकसान होणार नाही. त्यातच मोगऱ्याच्या फुलांना वर्षभर मागणी असते. त्यामुळे यातून हमखास उत्पन्न मिळतेच. - सुरेंद्र पवार, शेतकरी चौधरवाडी
अधिक वाचा: Tractor Kharedi : शेतकऱ्यांनो स्वस्तात ट्रॅक्टर खरेदी करण्याची योग्य वेळ आली; असा घ्या फायदा?