Join us

Shetkari Apghat Vima Yojana: शेतकऱ्याचा अपघात झाला, वारसाला मिळणार दोन लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 15:48 IST

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेतून वारसाला दोन लाखांची मदत मिळते. वाचा सविस्तर

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana : स्व. गोपीनाथ मुंडेGopinath Munde शेतकरी अपघात सुरक्षा योजनेंतर्गत २०२३-२४ मध्ये बीड तालुक्यातील ३९ मयत शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. जखमींना एक लाख रुपये मिळतात.

प्रशिक्षणासाठी गेलेले जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी वेळोवेळी आढावा घेतल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तत्कालीन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी वेळोवेळी प्रस्ताव सादर केले.

त्यावर निर्णय घेतल्यामुळे सन २०२३-२४ या कालावधीत दाखल झालेल्या ५१ प्रस्तावांपैकी ३९ प्रकरणे मंजूर झाली असल्याचे बीडचे तालुका कृषी अधिकारी ए. व्ही. साळी व सदरील कामकाज पाहणाऱ्या सीमा अस्वले यांनी सांगितले. तसेच दोन जखमी शेतकऱ्यांना एक लाख मिळाले.

सन २०२४-२५ मध्ये १४ प्रकरणे प्राप्त असून, ८ प्रकरणे मंजूर केलेली आहेत. उर्वरित ६ प्रकरणांत लवकरच त्रुटींची पूर्तता करण्यात येईल. अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव, बीडचे तालुका कृषी अधिकारी अशोक साळी यांनी केले आहे.

कशासाठी दिला जातो लाभ ?

* स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेंतर्गत शेती करताना वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, रस्ता रेल्वे अपघात आदी कारणांमुळे शेतकऱ्यांना लाभ दिला जातो.

* अपघातग्रस्त शेतकऱ्यांना अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये व अपंगत्व आल्यास एक लाख रुपये लाभ दिला जातो.

* सदर योजनेत १० ते ७५ वर्षांची अट असून, महसूल नोंदीनुसार खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य जसे की आई-वडील, पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती, अशा एकूण २ जणांना या योजनेचा लाभ देता येतो.

* अपघातग्रस्त व्यक्तीचा परिपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव ३० दिवसांच्या आत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागतो.

* अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, बीड तालुका कृषी अधिकारी अशोक साळी यांनी केले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनासरकारी योजनासरकार