Join us

Sericulture Farming : यंदा रेशीम शेतीला मिळाली गती ; शेतात बहरली तुती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 16:03 IST

शेतकऱ्यांना रेशीम शेतीत प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळत आहे. त्यामुळे आता रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. (Sericulture Farming)

Sericulture Farming :  नैसर्गिक परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरू शकतो. पारंपरिक पिकांसोबतच कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांनी वळावे, यासाठी रेशीम शेतीला प्राधान्य दिले जात आहे.

याकरिता शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तीन वर्षांसाठी प्रति एकर ४ लाख १८ हजार ८१५ रुपयांचे अनुदान दिले जात आहे. आणि उत्पन्नातून नफा मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरली आहे.

पारंपरिक पिकांवरील खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदलामुळे उत्पादकतेत देखील घट होत असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीतशेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देण्याऱ्या पिकांकडे वळविण्यासाठी विविध जोड व्यवसायांना प्राधान्य दिले जात आहे. रेशीम शेती वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा उत्पन्न मिळवून देणारीव कमी खर्चाची असल्याने याकडे शेतकऱ्यांनी वळावे, यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते.

या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान एक एकर जमीन तसेच बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध असावी. जिल्ह्यात रेशीम तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी महारेशीम अभियान राबविण्यात येते. या शेतीतून वर्षातून ४ ते ५ वेळा कोष उत्पादन घेता येते. इतर पिकांच्या तुलनेत खर्च कमी असून, हमखास उत्पन्न मिळते. गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा अंगीकार केला आहे.

९० टक्के पर्यंत अनुदानाची तरतूद

* महात्मा गांधी १ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड मजुरी, कीटक संगोपन साहित्य व कीटक संगोपन गृह बांधकाम, या करिता तीन वर्षांसाठी प्रति एकर ४ लाख १८ हजार ८१५ रुपये देण्यात येतात.

* सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत रेशीम शेतीसाठी अंदाजपत्रकीय ७ लाख ५० हजार रकमेच्या सर्वसाधारण लाभार्थ्यांना तुती लागवड, ठिबक सिंचन संच, कीटक संगोपन गृह बांधकाम, कीटक संगोपन साहित्य व निर्जंतुकीकरणऔषधी या घटकांकरिता ७५ टक्के व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येते.

* एक एकरासाठी ५ लाख रकमेच्या अंदाजपत्रकानुसार वरील प्रमाणे घटकांसाठी सर्वसाधारण लाभार्थ्यांना ७५ टक्के व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान मिळते.

एका गावात १५ शेतकऱ्यांना मिळतोय लाभ

* पारंपरिक पिकांसोबतच रेशीम शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी रेशीम कार्यालयाशी संपर्क साधून प्रति एकर ५०० रुपये नाव नोंदणी शुल्क भरावे.

* मनरेगा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ग्रामसभेमध्ये तुती लागवड विषय ठराव मंजूर करून घेण्यात यावा. एका गावात १५ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्ररेशीमशेतीशेतकरीशेती