Join us

कर्ज काढून बियाणं पेरलं मात्र निघालं बनावट; कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:53 IST

नियमबाह्य कामकाज आणि त्रुटी आढळल्याने कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे. त्यात १२ खत, बियाणे विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर १४ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

नियमबाह्य कामकाज आणि त्रुटी आढळल्याने कृषी विभागाने नांदेड जिल्ह्यातील २८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे. त्यात १२ खत, बियाणे विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर १४ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या तपासणीत कृषी सेवा केंद्रातील अनेक त्रुटी उघड झाल्या आहेत. यामध्ये भावफलक व साठा फलक न लावणे, विक्री परवाने दुकानदाराने दर्शनी भागात न लावणे, साठा पुस्तके अद्यावत न ठेवणे, स्त्रोत परवान्यात नमूद नसणे, ग्राहकांना निविष्ठा विक्रीच्या पावत्या न देणे, विक्री अहवाल दर महिन्याला सादर न करणे यांचा समावेश आहे.

या विक्रेत्यांची सुनावणी घेऊन त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर अशा २८ कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच विक्री परवानगी घेतली असतानाही दुकान बंद ठेवणाऱ्यांनाही लक्ष करण्यात आले.

या कारवाईमध्ये नायगाव येथील ८ कृषी सेवा केंद्राचा समावेश असून, हदगाव तालुक्यातील २ कृषी सेवा केंद्र तसेच नांदेड तालुक्यातील १ केंद्र, देगलूर तालुक्यातील २, कंधार १, किनवट ५, मुखेड २, उमरी ५, लोहा १ व मुदखेड तालुक्यातील एक कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे.

अनियमितता आढळल्यास कारवाई, शिक्षा आणि दंडाची तरतूद काय?

खरिप रब्बी हंगाम शेतकऱ्यांना खत आणि बियाणांसाठी कसरत करावी लागते. याचा फायदा घेत काही कृषी केंद्र चालक चढ्या दराने बियाणांची विक्री करणे, नामांकित खतांचा तुटवडा निर्माण करणे असे प्रकार करतात. अशी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून विशेष पथक गठीत केले जातात. कुठे अनियमितता आढळून आली तर हे पथक संबंधित कृषी केंद्र चालकांवर कारवाई करतात. गंभीर प्रकार आढळल्यास केंद्राचा परवाना रद्द तसेच काही काळापुरता निलंबित करण्याची देखील तरतूद आहे.

नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा

खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि नियमानुसार सेवा मिळाव्यात यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. अशाच प्रकारची नियमित तपासणी सुरू राहणार असून, नियमभंग करणाऱ्या विरोधात यापूढे देखील कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिला आहे.

हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीखरीपनांदेडनांदेडपीकसरकारशेती