डॉ. सुधीरकुमार गोयल, निवृत्त, अपर मुख्य सचिव (कृषी) महाराष्ट्र राज्य
अल्पभूधारक व सिमांत शेतकरी भारत देशात मोठ्या संख्येने असून लोकसंख्या वाढीसोबतच त्यांची संख्या सुद्धा वाढत असल्याने उत्पन्न वाढीबरोबरच शहरातील छोटया कुटुंबाची संख्या सुध्दा हळूहळू वाढत आहे. अशा शेतकरी वर्गाला देशातील सेंद्रिय अन्नपदार्थांची मोठ्या प्रमाणावर वाढत जाणाऱ्या मागणीची नोंद घेऊन त्याच्या लागवडीचे नियोजन करणे आवश्यक आहे.
सुरुवातीला परदेशातून जास्त उत्पन्न गटाकडून असलेली सेंद्रिय अन्नपदार्थांची मागणी भारतातील उच्च उत्पन्न गटामार्फत सुध्दा निर्माण होत आहे. सेंद्रिय शेतीशी निगडीत विविध कामकाज करण्यासाठी कृषिनिविष्ठा विकत घेण्याऐवजी तो खर्च शेतमजूरावर करावा लागतो. शेतमजूरामार्फत हाताने खुरपणी करण्याऐवजी तणनाशकाचा वापर करण्यात येऊ लागला आहे. परंतू सेंद्रिय शेतीत रासायनिक निविष्ठा एका मयदिपेक्षा जास्त वापरणे अपेक्षित नाही. एकात्मिक किड व्यवस्थापनामुळे रासायनिक किटनाशकांचा भरमसाठ वापर सुरु झाला, परंतू यापूर्वी गांडूळ खत, कंपोस्ट खत आणि जमिनीवर आच्छादनाचा वापर या पध्दतीचा शेतीमध्ये वापर केला जात असे. त्याऐवजी आता रासायनिक खतांचा वापर वाढलेला आहे.
सुक्ष्म सिंचनाचा अथवा ठिबक सिंचनाचा सुद्धा वापर वाढलेला असून पाण्याच्या अतिवापराचा जमिनीला असणारा धोका व पाण्याची कमतरता या शक्यतांचा विचार करून पाटाने पाणी देणे अथवा मोकळे पाणी सोडून देण्याच्या पध्दतीच्या तंत्रज्ञानाचा वापर कमी झाला आहे. या सर्व पारंपारीक पध्दतीची अंमलबजावणी करताना शेतमजूरांचा खूप वापर करण्यात येत असे. परंतु आता नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीमध्ये शेतमजूरांचा कमी प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु छोट्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकतो.
सेंद्रिय शेती करण्यासाठी स्थानिक स्तरावरील शेतीतील जमीनीची सुपिकता, जमीनीचा प्रकार, परीसरातील किडींचा, प्रकार हवामान आणि मोठ्या प्रमाणावर पिक उत्पादन घेण्याच्या पध्दती, कृषि निविष्ठांचा प्रभावी वापर या सर्व घटकांबाबत माहिती असणे आवश्यक आहे. अल्पभूधारक शेतकरी वर्गाला त्यांच्या स्वतःच्या छोटया जमीनीची इंच न इंच माहिती असते. त्यामुळे ते नैसगिकरित्या मोठ्या शेतकरी वर्गाच्या तुलनेत उत्तमरित्या शेतात सेंद्रिय पिकाचे उत्पादन घेऊ शकतात.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यात शेतकरी वर्गाला कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या कराव्या लागलेल्या आहेत. शेतीत मोठया प्रमाणावर महागड्या कृषि निविष्ठांचा वापर आणि त्याकरीता कृषि निविष्ठा खरेदी करण्यासाठी सावकाराकडून जास्त व्याजदाराने घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे अनेक विविध कारणांपैकी या कारणामुळे झाल्याचे दिसून आले आहे. सेंद्रिय शेती हा कृषि निविष्ठांचा वापर कमी करून त्यासाठी कर्ज बाजारी न होता शेती करण्याचा एक शाश्वत शेतीचा पर्याय आहे.
अल्पभूधारक व सिमांत शेतकरी वर्गाला कर्ज देणाऱ्या वित्तीय व्यवस्थेकडून वगळले जात असून त्यांना सेंद्रिय शेती करण्यामुळे वित्त पुरवठा करणाऱ्या वित्तीय कंपन्या यापुढील काळात सहकार्य करतील असे चित्र लवकरच निर्माण होऊ शकेल. जागतिक बाजारपेठेतील "फेअर ट्रेड" या कार्यपद्धतीमुळे किंवा त्यांच्या उत्पादनांमुळे छोटया उत्पादकांचे कृषि क्षेत्रात महत्वाचे स्थान निर्माण होणार आहे. श्रीमंत व अतिश्रीमंत ग्राहक, प्रमाणीकरण केलेल्या शेतमालाला आणि इतर वस्तूंना नेहमी जास्तीत जास्त बाजारभाव देऊन छोटे शेतकरी किंवा छोटया शेतकऱ्यांची सहकारी संस्था किंवा इतर सामाजिक संस्थांकडून अशा वस्तू खरेदी करण्यास तयार असतात. अशा सामाजिक संस्था कायमच अडचणींना तोंड देत असतात. परंतू मागील काही वर्षात त्यांच्या उत्पादनांचा खरेदी करणारा एक ग्राहक वर्ग तयार झाला असून अशा संस्थाकडील उत्पादनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
जागतिकीकरणातील विविध अत्याधुनिक बाजारपेठेत प्रमाणित पदार्थ आणि नवनवीन डिझाईन अथवा रचना असणाऱ्या वस्तूबद्दल आकर्षण कमी होऊ लागले असून यामध्ये प्रामुख्याने कपडे, फर्निचर, घरगुती सजावटीच्या वस्तू त्यांचा समावेश होतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना आपल्या आवडीनिवडी थेट कंपन्यापर्यंत पोहचविणे सोपे झाले आहे.
एकात्मिक मूल्यवर्धन साखळी उभारून कृषीक्षेत्राचा कायापालट
शेती हा विविध प्रक्रियांची भलीमोठी साखळी असलेला एक व्यवसाय आहे. या सर्व प्रक्रिया अशा पद्धतीने एकमेकांशी जोडलेल्या असतात, की उत्पादनापासून ते विपणनापर्यंत आणि शेवटी उत्पादनाचा उपभोग घेईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यामध्ये मूल्यवृद्धी होत राहते. मात्र अनेकदा आपण अनुभवतो की, अनेक नफेखोर मध्यस्थांच्या मार्फत ही एकात्मिक कृषिमूल्य साखळी अकार्यक्षमपद्धतीने जोडली गेलेली असल्याने ती दुबळी होते. खरे पाहता, मध्यस्थ म्हणून काम करताना, शेतमाल पुरवणा-या सेवांचा मोबदला म्हणून शेतकरी आणि ग्राहकांकडून अवाजवी किंमत वसूल केली जाते. परिणामी, या प्रक्रियेमध्ये कोणतीही समान मूल्यवृद्धी होत नाही. उलट, शेतकऱ्याला कमी मोबदला मिळतो व ग्राहकाला जास्त भावाने शेतमाल विकत घ्यावा लागतो.
एकात्मिक कृषी मूल्यवर्धन साखळीतील विविध घटक
आपल्याला आदर्श म्हणता येईल अशा एकात्मिक कृषी मूल्यवर्धन साखळीचे मुख्य घटक कोणते असतील ? यावर विचार होणे आवश्यक आहे. ही यादी विविध पिकांच्या प्रकारानुसार कमी अधिक प्रमाणात समान अथवा मोठी असू शकते. त्यामध्ये खालील अनेक बाबी, क्रिया व प्रक्रियांचा समावेश असतो, त्यानुसार मातीमधील सेंद्रिय घटक यासह कार्बन व नायट्रोजन यांचे प्रमाण, मातीतील आर्द्रतेचे संरक्षण, कीटकांचा नाश करण्याचे गुण असलेले बियाणे किंवा रोपे, कृषीसाठी अनुरूप असणारे पर्यावरण व हवामान, शास्त्रशुद्ध कृषिविज्ञानावर आधारलेली कार्यपद्धती, जमिनीची योग्य मशागत, संतुलित पोषण, पिकांचे सेंद्रियपद्धतीने परिणामकारक संरक्षण, मातीतील जिवाणू व इतर घटकांकरीता आवश्यक असणाऱ्या जमिनीतील पोषक वातावरण निर्मितीसाठी विविध कार्यपद्धती, संरक्षित व शाश्वत सिंचन सुविधा, वेळेवर पिकांची कापणी, कापणीनंतरच्या विविध क्रिया, काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सुरक्षित साठवणूक व शाश्वत वाहतूक व्यवस्था, फायदेशीर व खात्रीशीर विपणन, किरकोळ व घाऊक अशा सर्व प्रकारच्या विक्रीव्यवस्थेतील पारदर्शकता, शेतमालाच्या मूल्यवृद्धीसाठीच्या विविध प्रक्रिया आत्मसात करण्याची तयारी व सुविधा; देशांतर्गत बाजारपेठ किंवा देशाबाहेरील निर्यातीची खात्रीशीर प्रक्रिया; अन्नधान्याचे कमीतकमी नुकसान व अपव्यय, डिजीटायझेशनचा वापर इत्यादींमुळे ही यादी आणखीही मोठी होऊ शकते. मात्र त्याहूनही अधिक चिंतेचा विषय म्हणजे, शाश्वत अन्नधान्य प्रणाली विकसित करणे आणि हवामान बदलाच्या आव्हानाला सामोरे जाणे.
शेतकऱ्यांकडून नागरी समाजाच्या अवास्तव अपेक्षा
सद्यपरिस्थितीत, शेतकरी समुदायाचा विचार केला तर त्यातील जवळपास ८५% शेतक-यांची संख्या ही अत्यल्पभूधारक या प्रकारात गणली जाते. अशा उपेक्षित शेतकरी समुदायाकडून मात्र शासन, विचारवंत, संशोधक, खाजगी क्षेत्र आणि नागरी समाज संस्था यांच्या अपेक्षा मात्र फारच अवास्तव असल्याचे अनुभवायला मिळते.
शेतकऱ्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय किंवा शासकीय विस्तार यंत्रणेकडून (extension machinery) होणाऱ्या (extension machinery) तुटपुंज्या मदतीतून स्वतःचा विकास घडविला पाहिजे, असे या मंडळींना वाटते. अशा मर्यादित संसाधनातून आवश्यक ते ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान, विविध प्रकारच्या योजना व सेवा, कृषि निविष्ठा (खते, औषधे व बियाणे) या बाबी अशा पद्धतीने एकत्रित आणणे आवश्यक आहे की ज्यामुळे शेती हा फायदेशीर व्यवसाय बनेल, एवढेच नव्हे तर अन्न व पोषकद्रव्यांची सुरक्षितता देखील होऊ शकेल आणि पर्यावरणावर कोणतेही दुष्परिणाम न होता, शेतीव्यवसायाचे पुनरुज्जीवन होईल.
मात्र कृषी मूल्यवर्धन साखळीशी जोडल्या गेलेल्या किती जणांना हे खरोखरच शक्य आहे असे वाटते? यावर विचारमंथन होऊन गरजेचे असून त्यानुसार उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
कृषिक्षेत्रातील आव्हाने
कृषिक्षेत्रातील विविध जाणकार व तज्ञ असा युक्तिवाद करतात की, दहा हजार वर्षांहून अधिक काळापासून आमच्या मेहनती शेतकऱ्यांनी स्वतःच शेतीमधील वरील सर्व प्रक्रिया व घटकांचे एकीकरण केले. त्याच बरोबर असेही सोयिस्करपणे गृहित धरले जाते की, ही एकात्मिकता आपल्याकडे सुरुवातीपासूनच अस्तित्वात असून, त्यामुळेच आपला देश हा अन्नधान्यसुरक्षेच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकला. मात्र असे गृहीत धरणे हे पूर्णपणे चुकीचे असून, नेमकी याच प्रकारची मानसिकता कृषिक्षेत्राचा कायापालट होण्यामधील सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचे आपल्याला म्हणता येईल.
अन्नधान्य सुरक्षितता संकटातकृषिक्षेत्राच्या अगदी प्रारंभबिंदूपासूनच प्रामुख्याने उदरनिर्वाहासाठी शेती केली जायची. काळाच्या ओघात, जेव्हा त्यामध्ये अधिक उपयुक्त ठरणा-या कृषिशास्त्रपद्धतींचा तसेच वरून देण्यात येणा-या अतिरिक्त खते औषधे व बियाणे यांचा वापर सुरू झाला, त्यानंतरच शेतीच्या उत्पादन व्यवस्थेमध्ये हळूहळू स्थित्यंतरे घडायला सुरुवात झाली.
त्यानंतरच गरजेनुसार उत्पादित मालाची अधिकाधिक विक्री होण्याकरीता बाजारप्रणित विक्रीव्यवस्था उभी राहिली. अर्थात या प्रकारच्या स्थित्यंतरामुळे आपल्या समोर अनेक प्रकारची नवनवीन आव्हाने देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळते, प्रचलित उत्पादन पद्धती असो की, सध्याची विपणन आणि वितरण व्यवस्था असो, ही व्यवस्था शेतक-यांना अजिबात परवडणारी नसून, त्यामुळे कृषिक्षेत्रावरील संकटात भर पडली आहे, असं म्हंटले तर ते वावगे ठरू नये.
त्याच बरोबर, शाश्वत शेतीविकासासाठी आवश्यक असणा-या नैसर्गिक संसाधनांची गुणवत्ताही खालावल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. खाद्यतेलासारख्या वस्तुंची मोठ्या प्रमाणात होत असलेल्या आयातीचे उदाहरण असो, वा समाजातील कुपोषणाचे वाढतच जाणारे मोठे प्रमाण असो अथवा भूकेच्या समस्येचे भयावह रूप असो, एकंदरीतच, अन्नसुरक्षा धोक्यात आल्याचे आपण निर्विवादपणे मान्य करायला हवे. परंतु यावर करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तर ही चित्र बदलण्यास नक्कीच वाव आहे.
- मंगेश तिटकारे (व्यवस्थापकीय संचालक , महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे)
- प्रशांत चासकर(शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट एमसीडीसी, साखर संकुल, पुणे)