Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोही, रानडुकरांचा शिवारात हैदोस, शेतकरी वैतागले; वन विभागाची गस्त गेली कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 14:50 IST

कळमनुरी तालुक्यातील रामेश्वरतांडा व परिसरातील सात ते आठ गावांमध्ये रोही व रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत ...

कळमनुरी तालुक्यातील रामेश्वरतांडा व परिसरातील सात ते आठ गावांमध्ये रोही व रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तोंडी व निवेदन देऊनही वन विभाग काही लक्ष देत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कळमनुरी तालुक्यातील रामेश्वरतांडा, कोपरवाडी, उमरदरावाडी, एकघरी हा परिसर चारी बाजूंनी डोंगराने व्यापला आहे. जंगलाला लागून काही शेतकऱ्यांचे शेत असून वन्यप्राणी शेतातील पिकांची नासाडी करीत आहेत.

खरीप हंगामापासून वन्यप्राण्यांचा त्रास होत असून वेळोवेळी वन विभागाला सांगण्यात आले; परंतु, रबीहंगाम सुरू झाला तरी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त केला नाही. शेतकऱ्यांनी उसनवारी करून हरभरा, ज्वारी, करडई, गहू आदी पिकांची पेरणी केली आहे; परंतु, वन्यप्राणी नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

वन विभागाची गस्त गेली तरी कुठे?

■ रामेश्वर तांडा व परिसरातील शेतशिवारातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा त्रास होऊ नये, पिकांची नासाडी होऊ नये, म्हणून वन विभागाने गस्त ठेवली आहे, असे सांगितले जाते; परंतु, गेल्या काही दिवसांपासून एकही कर्मचारी गस्तीवर आढळला नाही.

■ त्यामुळे दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिकांची नासाडी होत आहे.

■ वन विभागाने रब्बी हंगामात तरी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

टॅग्स :शेतकरीशेती क्षेत्र