Pune : व्यापारी, उद्योजक आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तांदूळ खरेदीची सुवर्णसंधी निर्माण झाली असून भारतीय अन्न महामंडळाने तांदूळ विक्री सुरू केली आहे. यामुळे कमीत कमी दरात तांदूळ खरेदी करता येणार आहे.
केंद्र शासनांतर्गत असणाऱ्या भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेची गोदाम पुरवठा साखळीत व देशातील अन्नधान्य खरेदी व वितरण व्यवस्था तसेच अन्नधान्याच्या बाजारभावाचे स्थिरीकरण व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ही योजना असल्याची माहिती भारतीय अन्न महामंडळाने दिली आहे.
दरम्यान, भारतीय अन्न महामंडळाने लहान खाजगी व्यापारी/उद्योजक/व्यक्तींना/शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था यांच्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदुळाची थेट विक्रीची योजना जाहीर केली आहे. प्रत्येक लाभार्थ्यांसाठी कमीत कमी १० ते जास्तीत जास्त ९० क्विंटल तांदूळ २ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल (अतिरिक्त कर लागू) या दराने उपलब्ध करून देण्यात येत असून सरकारी दरानुसार पारदर्शक विक्री प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
तांदूळ खरेदीसाठी केवळ आधार कार्ड आणि पॅन कार्डची आवश्यकता असून व्यापारी उद्योजक आणि संस्थांना जीएसटी प्रमाणपत्र अनिवार्य असेल. अधिक माहितीसाठी भारतीय अन्न महामंडळाच्या कोरेगाव पार्क, पुणे येथील शाखेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्कदूरध्वनी - ०२० - २६१५९०७४इमेल - commpune.fci@gov.in