पुणे : राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा एक राज्य एक नोंदणी हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत लागू करण्यात आला होता.
त्यानंतर तांत्रिक कारणास्तव हा उपक्रम आता जिल्ह्यापुरताच मर्यादित ठेवला आहे. राज्यात १ मेपासून सर्व जिल्ह्यांत एक जिल्हा, एक नोंदणी उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील दस्त कोणत्याही तालुक्यातून करता येणे शक्य होणार आहे. परिणामी नागरिकांची दस्त नोंदणीच्या कामासाठी वेळ आणि पैसा वाचणार आहे.
राज्य सरकारने 'वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन' करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची अंमलबजावणी करण्याच्या हेतुने प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांत सुरू करण्यात आली.
पूर्वी या दोन जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र नोंदणी केली जात होती. या निर्णयानुसार या दोन जिल्ह्यांमधील दस्त नोंदणी कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात करता येते.
याच धर्तीवर हा उपक्रम सबंध राज्यभर राबविण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदभार स्वीकारताच दिले होते. मात्र, तांत्रिक अडचणी बघता विभागाने त्याला नकार दिला होता. आता हा उपक्रम जिल्ह्यापुरताच मर्यादित ठेवला आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आता 'एक जिल्हा, एक नोंदणी' हा उपक्रम हाती घेऊन पहिल्या टप्प्यात जिल्ह्यांतंर्गत दस्त नोंदणीचा प्रयोग सुरू केला आहे.
त्याबाबत महसूल विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांनी ३० एप्रिल रोजी रात्री उशिरा अधिसूचना जारी केली. त्यामुळे जिल्हानिहाय दस्त नोंदणी करण्याचा मार्ग मोकळा झाला.
नोंदणी मुद्रांक विभागाकडून 'आय सरिता १.९' या संगणकप्रणालीवर दस्त नोंदणी सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४९ कार्यालये, राज्यातील ५१० दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये जिल्हानिहाय दस्त नोंदणी करता येणार आहे.
नव्याने संगणक प्रणाली विकसित- नव्याने २.० ही संगणकप्रणाली विकसित होत असून त्यावर सध्या 'लिव्ह अँड लायसन्स'चे कामकाज सुरू आहे.- त्यात काही तांत्रिक समस्या येत असल्याने त्यावरील प्रक्रिया तूर्त बंद आहे.- मात्र, १.९ या संगणकप्रणालीवर, दस्त नोंदणी सुरू असल्याने 'वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन' करणे शक्य नसल्याचे नोंदणी मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांचे मत झाले.- त्यामुळे 'वन स्टेट' ऐवजी जिल्हानिहाय दस्त नोंदणी करण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नोंदणी मुद्रांक विभागातील सर्व जिल्ह्यांतील दुय्यम निबंधक कार्यालयांचे एक जिल्हा, एक नोंदणी अंतर्गत कार्यक्षेत्र सामाईक करण्यात येत आहे. म्हणजेच एका जिल्ह्यातील सर्व मिळकतींचे दस्त जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविता येणार आहे. - रवींद्र बिनवडे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक
अधिक वाचा: एक रुपयात पिक विमा बंद; आता राज्यात अशी राबवली जाणार पिक विमा योजना