Join us

हिमालयाच्या डोंगरी भागातला लाल लसूण आला बाजारात, आता बिनधास्त द्या लसणाचा तडका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 10:39 AM

पहिल्यांदाच आला हिमाचलचा लसूण छत्रपती संभाजीनगरात...

लसणाशिवाय भाजीला फोडणी देण्याचा गृहिणी विचारही करू शकत नाही. मग, तो कितीही महाग झाला तरी छटाक का होईना लसूण खरेदी केला जातोच. आता तर फोडणीची चव वाढविण्यासाठी भाजीमंडईत खास हिमाचलच्या डोंगरी भागातून लालसर लसूण आला आहे. हिमाचलचा लसूण थेट तुमच्या खाण्यात येणार आहे.

अनेक जण दरवर्षी सहलीसाठी शिमल्याला जात असतात. हा शिमला जिल्हा लसणासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय हिमाचलमधील सोलन, सिरमौर या जिल्ह्यांत लसणाचे विक्रमी उत्पादन होते. या राज्यातून बांगलादेश, नेपाळ या देशांतही लसूण निर्यात होत असतो. दरवर्षी सोलन भाजीमंडीत वर्षभरात १५० कोटींची उलाढाल फक्त लसणाची होत असते. देशात पंजाब, हरयाणा व दिल्लीत मोठ्या भाजीमंडईत आवक झालेला हाच तो हिमाचलचा लाल लसूण.

काय भावाने होतेय विक्री?

प्रमाणात हिमाचलचा लसूण विकला जातो. पहिल्यांदाच आला हिमाचलचा लसूण छत्रपती संभाजीनगरात पहिल्यांदाच हिमाचलचा लसूण विक्रीला आला आहे. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत बाजारात एक ट्रक भरून लसूण आला. लाल रंगाचा व मोठ्या आकारातील हा लसूण औरंगपुरा भाजीमंडईत ३५० रुपये किलोने विकला जात आहे, तसेच आपल्या जिल्ह्यातील गावरान लसूणही ३५० रुपयांनी, तर हायब्रिड लसूण २०० रुपये किलोने विकला जात आहे.

आरोग्यास फायदेशीर

हा हिमाचलचा लसूण ग्राहक आर्वजून खरेदी करीत असल्याची माहिती लसूण विक्रेता संजय वाघमारे यांनी दिली. लसूण आरोग्यासाठी लाभदायक असतो. हिमाचलच्या लसणातही अँटिऑक्सिडेंट मोठ्या मात्रेत आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते व इतर गुणधर्मही यात आहेत.

टॅग्स :मार्केट यार्डऔरंगाबादबाजार