Join us

Raywal Mango गुणवैशिष्ट्यांनी नटलेला हा आंबा होतोय गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 1:34 PM

हापूस आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. मात्र, असे असले तरी कोकणी माणसाला हापूस आंब्याइतकाच रायवळ आंबाही आवडतो. स्वाद आणि रस अशा गुणवैशिष्ट्यांनी नटलेला रायवळ आंबा असून, दिवसेंदिवस या आंब्याची झाडे गायब होत आहेत.

हापूस आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. मात्र, असे असले तरी कोकणी माणसाला हापूस आंब्याइतकाच रायवळ आंबाही आवडतो. स्वाद आणि रस अशा गुणवैशिष्ट्यांनी नटलेला रायवळ आंबा असून, दिवसेंदिवस या आंब्याची झाडे गायब होत आहेत.

रायवळ आंबा खाताना त्याचा रस तोंडभर पसरलाच पाहिजे. ही लज्जत हापूस आंब्याच्या गर्दीत आता हरवून गेली आहे. पूर्वी घराघरात आणि अंगणामधील झाडांवर लगडणारा रायवळ आंबा आता बाजारातूनही दिसेनासा झाला आहे.

भारतात देशी आंब्यांच्या अनेक जाती आहेत. परंतु, हापूस आंब्याचे व्यावसायिकरण झाल्यानंतर अनेक आंब्यांना ग्रहण लागले. कोकणातील रायवळ आंबाही असाच हरवून गेला आहे. कुठल्याही जमिनीवर या आंब्याचे झाड सहज वाढते. त्याची फार काही जोपासनाही करावी लागत नाही.

ग्रामीण भागात वाडीवाडीवर, अंगणात, परसात, बांधांवर रायवळ आंब्याची अनेक झाडे पूर्वी दिसायची मात्र, आता हळूहळू ही झाडे नष्ट होऊ लागली आहेत. रस्त्यावरून जाताना झाडावर लगडलेले आंबे दगडाने नेम धरून पाडून तिथेच खाण्याची मज्जा काही औरच असते.

बच्चे कंपनी हा आनंद लुटत असतात. हापूस आंबे जसे चव व आकाराने सारखेच असतात. तसे रायवळ आंब्याचे नाही. प्रत्येक झाडावरील आंब्याची चव, रंग व आकार वेगवेगळे असतात. काही खूपच गोड असतात; तर काही आंबट, यावरूनच त्यांची नावे ठेवली जातात.

साखऱ्या, बाटल्या, खोबऱ्या, बिटकी अशी शेकडो नावे असतात. पूर्वी गावातील सीमाही रायवळ आंब्याच्या नावावरून ओळखल्या जात. परंतु, आता हे आंबे दिसेनासे झाले आहेत. इमारतींसाठी व जळणासाठी रायवळ आंब्याच्या झाडांची तोड मोठ्या प्रमाणात झाली आहे.

घरबांधणी, रस्ता रुंदीकरण तसेच आंबा पेटीसाठी व इतर वापरासाठी रायवळ आंब्याच्या झाडांची कत्तल होऊ लागली. त्यातच रायवळ आंब्याच्या झाडांवर हापूसचे कलम करण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे रायवळ आंब्याचे झाडच शिल्लक राहिलेले नाही, अशी सध्याची स्थिती झाली आहे.

रायवळ नष्ट होण्याच्या मार्गावरकोकणातल्या मातीतील हा अस्सल रायवळ आंबा आता जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता नवीन लागवडीबरोबरच जुन्या शिल्लक राहिलेल्या झाडांचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे झाले आहे.

अधिक वाचा: Mango Rejuvenation जुन्या आंबा बागेचं उत्पादन कसं वाढवाल, असे करा व्यवस्थापन

टॅग्स :आंबाकोकणहापूस आंबाहापूस आंबाशेतीशेतकरी