सूर्यकांत निंबाळकरआदर्की : शहराच्या ठिकाणी नोकरीला असल्यानंतर पुढे शेती करणे सहज शक्य नसते. शेती करण्याची मानसिकताही होत नाही.
पण, हिंगणगाव येथील रणजित भोईटे हे आयटी क्षेत्रातील १० वर्षांची नोकरी सोडून गावी ७० एकर शेतीचे व्यवस्थापन पाहू लागलेत.
यामधील २० एकर क्षेत्रातील आंबा बागेतून दरवर्षी ५० लाखांचे उत्पादन घेतात. त्यांची ही भरारी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायीच आहे.
फलटण तालुक्यात हिंगणगाव आहे. या भागात पूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष होते. पण, १० वर्षांपूर्वी धोम-बलकवडीचा कालवा गेला आणि पाणी उपलब्ध झाले. येथील उल्हासराव भोईटे हे पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झाले.
त्यांनी सर्व शेती लागवडीखाली आणली होती. पाच वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलगा रणजित भोईटे यांना शेतीकडे लक्ष द्यावे लागले.
ते आयटी क्षेत्रात नोकरीला होते. आज त्यांच्याकडे सुमारे ३० एकर ऊस आणि २० एकरवर आंब्याची बाग आहे. तसेच इतर पिकेही ते घेतात.
रणजित भोईटे यांची माळरानावर २० एकर आंबा बागेत ६ हजार झाडे आहेत. यामध्ये केशरची ५ हजार, ८०० हापूस आणि रत्नाची १०० झाडे आहेत.
६० रुपये ते ८० रुपये किलो आंबा फळांना बाजारात होलसेलमध्ये तर किरकोळमध्ये १२० ते १८० रुपये किलो दर मिळतो.
रासायनिक सोबतच जैविक खतांचा वापर करून लवकर म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आंब्याच्या झाडाला मोहोर आला तर मार्च महिनाअखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला आंबा तयार होतो. आंब्याला खात्रीशीर भाव मिळतो. इतर फळबागांच्या तुलनेत आंब्याला मजूरवर्ग कमी लागतो. फवारणीचा खर्च, रोगाचे प्रमाणही कमी राहते. - रणजित भोईटे, शेतकरी, हिंगणगाव
अधिक वाचा: काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न