Join us

Ranbhaji Bajar : रानभाज्यांचे संवर्धन आणि विविधता जपणारा पालघरचा रानभाजी बाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:30 IST

रानभाज्या हा आहार संस्कृतीचा एक भाग आहे. मात्र, जंगलांचा हास होऊ लागल्याने ही आरोग्यदायी संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे आता रानभाज्यांच्या संरक्षण व संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे.

रानभाज्या हा आहार संस्कृतीचा एक भाग आहे. मात्र, जंगलांचा हास होऊ लागल्याने ही आरोग्यदायी संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे आता रानभाज्यांच्या संरक्षण व संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यामध्ये कामानिमित्त माझे जाणे-येणे सुरू असते. गेल्या आठवड्चात बुधवारी असलेला तालुक्याचा आठवडी बाजार मला खासच दिसला. बाजारामध्ये लोकांची झुंबड उडाली होती.

रस्त्यावर चालायलाही जागा नव्हती. छत्र्या, रेनकोट, इरली, घरांच्या छतावर टाकायला प्लास्टिक ह्यांचे स्टॉल तर लागले होतेच, पण बरोबरीने बाजारात लक्षणीय गोष्ट होती ती म्हणजे रानभाज्या.

रस्त्याच्या दुतर्फा काही जण रानभाज्यांचे वाटे लावून विकायला बसले होते. मी जवळ जाऊन पाहिले तर 'शेवली, पेव, टेटू, नाल, करडू, डीन, तेरा, वली, करांद, लोत, खापरा, टाकला, मोहटी' ह्या रानभाज्या यंदा पावसाला लवकर सुरुवात झाली असल्याने लवकर बाजारात आलेल्या दिसल्या.

पाऊस सुरू झाल्यावर डोंगराळ भागात, जंगलांमध्ये रानभाज्या उगवतात. स्थानिक रहिवाशांच्या नजरेस त्या पडल्या की, त्यांच्या आहारात ह्या भाज्यांचे प्रमाण वाढते.

रानभाज्यांच्या कंद, फळे, पाला, देठ, फुले अशा विविध भागांचा वापर केला जातो. काही रानभाज्यांची चव काहीशी तुरट, काहीशी कडवटही असते. स्थानिकांच्या मते विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या आरोग्याला पोषक असतात.

पावसाळ्यात होणाऱ्या पोटाच्या विकारांसाठी 'नाल' भाजी खाल्ली जाते. 'पेव' भाजीच्या देठातून खूप पाणी निघते. रानात पिण्यासाठी पाणी नसेल तर पेवचा देठ चोखून पाणी मिळवतात.

रानभाज्या त्या-त्या भागातील संस्कृतीचा भाग झालेल्या आहेत. जेव्हा शेतात पिकासाठी बी पेरणी सुरू करायची असते तेव्हा 'कोली' भाजी खाण्याची पद्धत काही भागांमध्ये आहे. 'शेवली' भाजी वाळवून वर्षभरासाठी साठवून ठेवली जाते.

पावसाळ्यातल्या रानभाज्या हे काही गावकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असते. रानात, डोंगरात भटकून भाजी आणण्याच्या कामी लहान मुलांचाही खूप उत्साह असतो. मुलं शाळा सुटल्यावर डोंगरात जाऊन भाज्या गोळा करण्यात गुंतून जातात.

ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी भागातील ह्या रानभाज्यांची चव चाखायची संधी हल्ली काही शहरी रहिवाशांनाही मिळते आहे. तुम्ही 'रानभाज्या महोत्सव' हा शब्द ऐकला असेल. अशा महोत्सवातून विविध रानभाज्यांची ओळख होते.

विविध चवींच्या भाज्या खाण्याचा विशेष अनुभव मिळतो. खतांचा, रसायनांचा वापर नसलेल्या रानभाज्या हा निसर्गान दिलेला अनमोल नजराणा आहे.

ग्रामीण भागातील जंगलतोड, जंगल जमिनींवर अतिक्रमण करून, जंगल जमीन सपाटीकरण करून लागवडीखाली आणल्यास रानभाज्या नष्ट होतात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात घेऊन जाणीवपूर्वक रानभाज्यांचे संवर्धन केले पाहिजे.

रानभाज्यांचे बियाणे मिळत नाही. त्यांची पेरणी करून त्या उगवता येत नाहीत. त्यांच्या संवर्धनासाठी त्या-त्या भागात उगवणाऱ्या रानभाज्यांसाठी काही भाग राखीव ठेवून भाज्यांचे बी तयार होऊ दिले पाहिजे.

एखाद्या भागातून ह्या भाज्या नष्ट झाल्या की, पुन्हा त्यांची रुजवण होत नाही. म्हणून ह्यांचे संरक्षण-संवर्धन गरजेचे आहे. 

- श्रुतिका शितोळेपर्यावरण अभ्यासकअधिक वाचा: Ranbhaji : मान्सून आधीच पावसाळी रानभाज्यांची बाजारात रेलचेल; माहीतगार खवय्यांची झुंबड

टॅग्स :भाज्याशेतीपालघरबाजारपेरणीअन्नऔषधं