Join us

Rajma farming: कमी दिवसात येणारा राजमा जास्त फायद्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:27 IST

Rajma farming: रब्बी हंगाम म्हटले की गहू, ज्वारी आलीच. यात अलीकडे हरभऱ्याचा तोरा वाढला. अशातच नव्या राजमा पिकाची (Rajama Crop) दमदार 'एन्ट्री' झाली असून, त्याला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने आता शेतकरी या पिकाकडे वळताना दिसत आहे.

बालाजी आडसूळ

रब्बी हंगाम म्हटले की गहू, ज्वारी आलीच. यात अलीकडे हरभऱ्याचा तोरा वाढला. अशातच नव्या राजमा पिकाची (Rajama Crop) दमदार 'एन्ट्री' झाली असून, दोन वर्षांत याच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे.

यंदा, एकरी उताऱ्याचा विचार करता 'कही खुशी, कही गम' अशी स्थिती असली तरी दराच्या संदर्भात मात्र स्थिरता दिसून येत आहे. यामुळे ज्यांना चांगला उतार काढता आला त्यांच्या हाती चांगला पैसा खुळखुळत आहे.

तालुक्यात रब्बी हंगामात (Rabbi Season) हरभरा, गहू, ज्वारी ही नियमित पिके घेतली जात असतानाच इटकूर व लगतच्या वाशी तालुक्यातील सेलू, सारोळा भागात मागच्या चार-पाच वर्षात राजमा दिसून आला.

या भागात तो रुळत असतानाच याची यशकथा इतर भागात पोहोचली. यामुळे नकळत तालुक्यातील इतर महसूल मंडलांतही राजमा क्षेत्र वाढले.

इटकूर, भोगजी, गंभीरवाडी, कोठाळवाडी, आडसूळवाडी आदी भागात राजमाचा वाटा पन्नास टक्क्यांवर पोहोचला. याच अनुषंगाने कोठाळवाडी येथील शेतकरी प्रवीण मुळे यांची यशोगाथा जाणून घेतली असता राजमा पिकानं त्यांना यंदा 'धनधान्य संपन्न' केल्याचे स्पष्ट झाले. नव्वद दिवसांच्या या पिकातून त्यांच्या पदरात चार लाखावर उत्पन्न पडले आहे.

रेकॉर्डब्रेक : एकरी दहा क्विंटलवर उतारा...

कोठाळवाडी येथील प्रवीण मुळे यांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्या साडेतीन एकरांवर 'वाघ्या' या राजमा वाणाची पेरणी केली.

उगवण झाल्यानंतर सहा दिवसातून एकदा ठिबकद्वारे तर चार दिवसाआड तुषार सिंचनाचा वापर करत पाणी दिले. सरासरी २० दिवसांना एक याप्रमाणे चार फवारणी केल्या, त्यांना एकरी १४ क्विंटलचा विक्रमी उतारा हाती पडला.

राजमा वाढला, हरभरा झाला कमी...

रब्बी हंगामाचे कळंब तालुक्यात एकूण क्षेत्र ६८ हजार हेक्टर आहे. यात अधिकांश वाटा हरभरा पिकाचा आहे. जवळपास ८० टक्क्यांवर क्षेत्र. मात्र, मागच्या तीन वर्षांत इटकूर परिसरात रुळावलेले राजमा पीक आता तालुक्यात विस्तारत आहे. यामुळे हरभरा क्षेत्र कमी झाले आहे. यंदा तर तब्बल ६ हजार हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात राजमा पीक झाले आहे.

६ हजार हेक्टर क्षेत्रावर राजमाची झाली लागवड

कळंब तालुक्यात यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र घटले असून, राजमाचे क्षेत्र ६ हजार हेक्टरवर जाऊन पोहोचले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

दराची स्थिती (क्विंटल)

वरुण६८०० ते ७०००
वाघ्या८५०० ते ९०००
ब्राझील९१०० ते ९२००
डायमंड५००० ते ५६००

चार लाखांवर उत्पन्न पडले शेतकऱ्याच्या पदरात

* प्रवीण मुळे यांनी एकरी १४ क्विंटलचा विक्रमी उतारा घेतला. शिवाय त्यांना प्रतिक्विंटल ९ हजार ७०० रुपयांचा दर मिळाला. हा दर समाधानकारक समजला जातो.

* यानुसार अवघ्या ९० दिवसांत हाती आलेल्या पिकांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांच्या पदरी चार लाखांवर एकूण उत्पन्न पदरी पडले. यातून खर्च वजा जाता बरा पैसा हाती आला.

राजमा पीक घेताना वेळच्या वेळी मशागत, फवारणी, पाणी पाळ्या याची काळजी घ्यावी लागते. हे पीक कष्टाचे आहे. यंदा भाव उच्चांकी नसला तरी समाधानकारक आहे. मला हे पीक यंदा लाभदायी ठरले. - प्रवीण मुळे, शेतकरी, कोठाळवाडी

तालुक्यात रब्बी हंगामाचे एकूण क्षेत्र ६८ हजार हेक्टर एवढे आहे. यात हरभरा प्रमुख पीक म्हणून गणले जाते. याशिवाय ज्वारी, करडी, गहू अशी पिके घेतली जातात. यंदा मात्र राजमा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. - भागवत सरडे, तालुका कृषी अधिकारी, कळंब

हे ही वाचा सविस्तर : Bamboo Farming: बांबू लागवडीतून होणार पर्यावरण संवर्धन; आर्थिक फायदा कसा ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकबाजार